'त्या' संघर्षातही आमदारांनी साथ सोडली नाही, आज इतिहास घडला - देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 12:58 PM2024-12-04T12:58:07+5:302024-12-04T12:59:22+5:30

या निवडणुकीचं विश्लेषण करायचं झालं तर 'एक है तो सेफ है' आणि 'मोदी है तो मुमकिन है' हे स्पष्ट झालं असं फडणवीसांनी म्हटलं. 

The responsibility has increased more than the joy that the people have given us such a large mandate for the first time - BJP Devendra Fadnavis | 'त्या' संघर्षातही आमदारांनी साथ सोडली नाही, आज इतिहास घडला - देवेंद्र फडणवीस

'त्या' संघर्षातही आमदारांनी साथ सोडली नाही, आज इतिहास घडला - देवेंद्र फडणवीस

मुंबई - महाराष्ट्रातील यंदाच्या निवडणूक ऐतिहासिक निकाल लागला. पहिल्यांदाच इतका मोठा जनादेश जनतेने आपल्याला दिला आहे याचा आनंद आहे त्यापेक्षा जबाबदारी वाढली आहे. जबाबदारीचं जाणीव करून देणारा जनादेश आहे. २०१९ नंतर सुरुवातीच्या अडीच वर्षात अनेक आमदार, नेत्यांनी संघर्ष केला परंतु एकानेही पक्षाची साथ सोडली नाही. आज प्रचंड बहुमत मिळवून इतिहास घडला अशी भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. 

भाजपाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सगळ्यांचे आभार मानले.  देवेंद्र फडणवीस म्हणाले की, २०१९ मध्ये जनतेचा कौल आपल्याला मिळाला होता मात्र तो कौल दुर्दैवाने हिसकावून घेण्यात आला. एकप्रकारे जनतेशी विश्वासघात केला गेला. सुरुवातीच्या अडीच वर्षात वेगवेगळ्या प्रकारे आपल्या नेत्यांना, आमदारांना त्रास देण्यात आला. मात्र अडीच वर्षात एकही आमदार आपल्याला सोडून गेला नाही. सगळे आमदार, सगळे नेते संघर्ष करत होते त्यातून २०२२ मध्ये आपलं सरकार स्थापन झाले. त्यानंतर आज प्रचंड बहुमत महायुतीला मिळालं. आजच्या निकालाने महाराष्ट्रात इतिहास घडला असं त्यांनी सांगितले. 

तसेच लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके युवा आणि समाजातील दलित, ओबीसी, वंचित सगळ्यांनीच जो जनादेश आपल्याला दिलाय त्याचा सन्मान राखण्याचं काम आपल्याला करावं लागेल. आपण सुरू केलेल्या योजना, दिलेली आश्वासने पूर्ण करणे याकडे प्राथमिकता असेलच, त्यासोबत महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी सातत्याने कार्यरत राहायचे आहे.  महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी २४ तास सरकार काम करेल. जनतेच्या आकांक्षा, अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सरकार काम करेल असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. 

दरम्यान, यावेळची निवडणूक ऐतिहासिक प्रकारची झाली आहे. या निवडणुकीचं विश्लेषण करायचं झालं तर 'एक है तो सेफ है' आणि 'मोदी है तो मुमकिन है' हे स्पष्ट झालं. देशात मोदींच्या नेतृत्वात विजयाची मालिका लोकसभेनंतर पुन्हा हरियाणापासून सुरू झाली. महाराष्ट्रातील जनतेला मी सांष्टांग दंडवत घालतो, त्यांनी इतक्या प्रचंड संख्येने आम्हाला कौल दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, रामदास आठवलेंसह सगळ्या मित्रपक्षांचे मी आभार मानतो. हे वर्ष अतिशय महत्त्वाचं आहे. ज्या प्रक्रियेतून आपण सगळे निवडून येतो, ती प्रक्रिया आपल्याला देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाला ७५ वर्ष पूर्ण होतायेत. धर्मग्रंथापेक्षा संविधान मोठं आहे. संविधानाच्या अमृत महोत्सवात आपण सरकार स्थापन करतोय असंही फडणवीसांनी म्हटलं. 

पुढची वाट अपेक्षापूर्तीसाठी संघर्षाची 

बूथ कार्यकर्ता म्हणून काम करणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सर्वोच्च पदापर्यंत नरेंद्र मोदी यांनी बसवले. तिसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदी बसण्याचा मान दिला. ७२ तासांसाठी का होईना तांत्रिकदृष्ट्या दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झालो होतो. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पक्षातील कार्यकर्त्यांना वेगवेगळी पदे मिळाली, सन्मान मिळाला. पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे आभार मानतो. त्याशिवाय ज्यांनी अतिशय ताकदीने या निवडणुकीत महाराष्ट्रात तळ ठोकून कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण केली. ताकद निर्माण केली ते अमित शाहा यांचे आभार मानतो. भाजपाच्या सर्व वरिष्ठ नेते, पक्षाचे कार्यकर्ते त्याशिवाय इतर राज्यातील कार्यकर्त्यांनी काम केले. महाराष्ट्रातील भाजपाच्या संपूर्ण टीमचे मी आभार मानतो. तुम्ही आहात म्हणून मी इथं आहे. तुम्ही नसता तर मी इथं नसतो. पुढची वाट अपेक्षापूर्तीसाठी  संघर्षाची आहे. आपलं महायुतीचं सरकार आहे. एकदिलाने सर्व मित्रांना सोबत घेऊन काम करायचे आहे. आपण मोठं उद्दिष्ट घेऊन राजकारणात आलोय. केवळ पदांसाठी राजकारणात नाही. येत्या काळात ४ गोष्टी मनासारख्या, ४ गोष्टी मनाविरुद्ध होतील तरीही एका मोठ्या उद्दिष्टाने आपण काम करू. आपली शक्ती दाखवून देऊ असा संदेश देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिला. 
 

Web Title: The responsibility has increased more than the joy that the people have given us such a large mandate for the first time - BJP Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.