अँटिबाॅडी कमी झाल्याने वाढतोय कोरोनाचा धोका, वैद्यकीय तज्ज्ञांचे निरीक्षण; अँटिबाॅडीजवर लक्ष ठेवावे लागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 07:35 AM2023-03-24T07:35:50+5:302023-03-24T07:35:58+5:30
कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्याविषयी सर्व स्तरातून प्रयत्न केल्यानंतर अनेक लाभार्थी आजही लसीच्या दुसऱ्या आणि वर्धक मात्रेपासून वंचित आहेत.
मुंबई : मागील काही दिवसांत इन्फ्लूएंझासह कोरोना संसर्गातही वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे इन्फ्लूएंझा रुग्णांसह कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. याबाबत वैद्यकीय तज्ज्ञांनी कोरोनाचा नवा व्हेरिएंट असल्याची शक्यता वर्तविली असून सामान्य नागरिकांमध्ये अँटिबाॅडी (प्रतिपिंड) कमी झाल्याने संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याची बाब अधोरेखित केली आहे.
कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्याविषयी सर्व स्तरातून प्रयत्न केल्यानंतर अनेक लाभार्थी आजही लसीच्या दुसऱ्या आणि वर्धक मात्रेपासून वंचित आहेत. त्यामुळे सध्याच्या कोरोना संसर्गाच्या वाढीचे हे सुद्धा कारण असू शकते, असे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले आहे. याविषयी राज्याच्या कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले की, ज्या नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीच्या सर्व मात्रा घेऊन बराच कालावधी उलटला आहे. त्यांच्यात ठरावीक कालावधीनंतर कोरोना लसीचा प्रभाव कमी झाल्याने अँटिबाॅडी कमी झाल्याचे दिसत आहे.
अँटिबाॅडीजना कोरोनाच्या नव्याने वाढणाऱ्या संसर्गाला विरोध करण्यासाठी काही कालावधी जाऊ द्यावा लागेल, त्यानंतर या वाढीचे नेमके कारण अधिक ठामपणे सांगता येईल. याविषयी, राज्याच्या कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले की, सध्या कोरोना संसर्गाच्या वाढीचे विश्लेषण करण्यासाठी रुग्णांची लक्षणे, त्याची तीव्रता आणि त्यांच्या अँटिबाॅडीजवर लक्ष ठेवावे लागेल. त्यानंतर या वाढीमागील वास्तव समोर येईल.
राज्यात सक्रिय रुग्ण १६०० पार
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, राज्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या १,६०० पार गेली असून सद्य:स्थितीत १ हजार ६१७ रुग्ण उपचाराधीन आहेत. राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुण्यात असून त्याखालोखाल मुंबई आणि ठाण्यात आहे. पुण्यात सध्या ४६०, मुंबईत ४०३ आणि ठाण्यात ३११ रुग्ण सक्रिय आहेत. राज्यात गुरुवारी १९८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून एकाही मृत्यूची नोंद नाही.
कोरोना संसर्ग कितपत वाढत आहे, त्याची तीव्रता किती आहे, हे पडताळावे लागेल. त्यानंतर अँटिबाॅडीजची संख्या कमी झाली असेल तर पुन्हा वर्धक मात्रा घ्यावी लागेल का? त्याची आवश्यकता आहे का? याबाबत केंद्राकडून येणाऱ्या मार्गदर्शक तत्त्वांची वाट पाहावी लागेल.
- डॉ. राहुल पंडित,
सदस्य, कोविड टास्क फोर्स