परिषदेतही सत्ताधारीच; ...म्हणून विधान परिषदेत सत्ताधाऱ्यांचाच वरचष्मा राहिला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2023 11:52 AM2023-07-30T11:52:27+5:302023-07-30T11:53:13+5:30
निधी वाटप आणि कंत्राटी पोलिस भरतीवरून काही प्रमाणात आक्रमक झालेल्या विरोधकांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तोडीस तोड उत्तर देत गारद केल्याचे चित्र दिसले.
मुंबई : पहिल्या आठवड्यातच संख्येचे गणित बिघडल्याने विरोधकांना काही सूर गवसला नाही. त्यामुळे विधान परिषदेत सत्ताधाऱ्यांचाच वरचष्मा राहिला. एसआरएपासून न्यायपीठापर्यंतची महत्त्वाची विधेयके अडथळ्यांशिवाय पार पडत सत्ताधाऱ्यांचाच आवाज बुलंद राहिला. निधी वाटप आणि कंत्राटी पोलिस भरतीवरून काही प्रमाणात आक्रमक झालेल्या विरोधकांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तोडीस तोड उत्तर देत गारद केल्याचे चित्र दिसले.
विधान परिषदेतील विरोधी बाकांवर विरोधकांचे अस्तित्वच जाणवत नाही. एकीकडे राष्ट्रवादीचे काही आमदार सत्ताधारी बाकावर असताना काँग्रेस तसेच अनिल परब वगळता ठाकरे गटाच्या आमदारांमध्ये ‘सत्ताधाऱ्यांच्या वाट्याला न गेलेले बरे’ अशीच मानसिकता राहिली.
उपसभापतींचे फ्लोअर मॅनेजमेंट
उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी फ्लोअर मॅनेजमेंट आत्मविश्वासाने हाताळले. मग गोपीचंद पडळकर यांना असंसदीय वागणुकीबद्दल शिक्षा करणे असो, ठाकरे गटाच्या आमदारांना वाढदिवसाला जायचे असताना कर्तव्याची जाणीव करून देणे असो की एसआरए विधेयक मांडताना विरोधकांनी अडचणीत आणलेले मंत्री अतुल सावे यांना सांभाळून घेत सभागृहातला गोंधळ टाळणे, या सर्वच बाबतीत त्यांनी कमालीचे व्यवस्थापन राखले.