भाजप अन् आमच्यात हाच फरक, संजय राऊतांनी फडणवीसांना दाखवला आरसा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 12:34 PM2022-11-21T12:34:36+5:302022-11-21T12:40:44+5:30
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे
काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरासंदर्भात केलेल्या विधानाचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. त्यावरुन, राजकारणही तापलं होतं, पण भाजप आणि शिंदे गटाच्या आंदोलनानंतर राहुल गांधींनीही आपल्या भाषणात सावरकरांचा उल्लेख टाळला. मात्र, यावरुन भाजपने शिवसेना ठाकरे गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी, उद्धव ठाकरे यांनीही राहुल गांधींचे विधान चुकीचेच आहे, असे म्हटले. आता, यालाचा धरुन शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी फडणवीसांना आरसा दाखवण्याचं काम केलंय. तसेच, भाजपात आणि शिवसेनेत हाच फरक असल्याचंही ते म्हणाले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानावरुन राज्यात संताप व्यक्त होत असून शिवसेनेच्या ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतला. राज्यपाल यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे जुने काळातील आदर्श आहेत, असे विधान केले होते. त्यावरुन, संजय राऊतांनी भाजपला प्रश्न विचारला आहे. आता, कोणाच्या फोटोला जोडे मारणार, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. त्यानंतर, याप्रकरणावर फडणवीसांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरुनही त्यांनी भाजपला लक्ष्य केलं.
“राहुल गांधींच्या वक्तव्याचे आम्हाला समर्थन करता आले असते. मात्र, आम्ही तसे केले नाही. आम्ही राहुल गांधींचा बचाव केलेला नाही, हाच आमच्यात आणि भाजपात फरक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर दुसरं कोणी काही बोललं असतं तर भाजपाने थयथयाट केला असता. पण, आज तुमचे राज्यपाल, तुमचे प्रवक्ते शिवरायांचा अवमान करणारी वक्तव्ये करत आहेत. हे सगळं ऑन रेकॉर्ड आहे. तरीही तुम्ही त्यांचा बचाव करत आहात. म्हणजेच तुमचे छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्रासंदर्भातील त्यांचे प्रेम खरे नाही, अशी टीका संजय राऊतांनी केली. तसेच महाराष्ट्रातील जनता राज्यपालांना माफी मागायला लावेल, असेही राऊत यांनी म्हटले.
आता यांच्या फोटोला जोडे मारणार का?
छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची पाच वेळा माफी मागितली असं विधान भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी विधान केलं आहे. या संतापजनक विधानाचं भाजपा समर्थन करता का? सावरकरांच्या मुद्द्यावरुन राहुल गांधींना जोडे मारण्याची भाषा करता मग आता अशी विधानं करणाऱ्या राज्यपाल आणि प्रवक्त्यांना जोडे मारणार आहात का?, असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित करत भाजपावर कडाडून टीका केली.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
प्रसार माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'जोपर्यंत चंद्र-सूर्य-तारे आहेत, तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आमचे आणि देशाचे आदर्श असणार आहेत. आजच्या भाषेत सांगायचे झाले, तर छत्रपती शिवाजी महाराज, हेच आमचे हिरो आहेत. कोणाच्याही मनात याबद्दल शंका नाही, राज्यपालांच्या मनातही याबद्दल शंका नसावी.' 'भगतसिंह कोश्यारी यांच्या बोलण्याचे वेगवेगळे अर्थ काढले गेले. छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा दुसरा कुठला आदर्श महाराष्ट्रात किंवा भारतात असू शकत नाही. सुधांशू त्रिवेदी यांचेही वक्तव्य मी नीट ऐकलं आहे. त्यांनी कुठल्याही वक्तव्यात महाराजांनी माफी मागितली, असे म्हटले नाही,' अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.