तेच टोमणे, तेच आरोप, तीच कॅसेट आता स्क्रिप्ट रायटर बदला; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 09:22 PM2023-06-19T21:22:24+5:302023-06-19T21:22:43+5:30

आगामी सर्व निवडणुका शिवसेना-भाजपा महायुती म्हणून लढवणार आहोत, त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे असं मुख्यमंत्री म्हणाले.

The same taunts, the same accusations, the same cassette, now change the script writer; Eknath Shinde's challenge to Uddhav Thackeray | तेच टोमणे, तेच आरोप, तीच कॅसेट आता स्क्रिप्ट रायटर बदला; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

तेच टोमणे, तेच आरोप, तीच कॅसेट आता स्क्रिप्ट रायटर बदला; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

googlenewsNext

मुंबई - तेच टोमणे, तेच आरोप, तीच कॅसेट, त्याचीच पुनरावृत्ती, स्क्रिप्ट रायटर तरी बदलायला सांगा. आम्ही आरोपांना उत्तर कामाने देणार. हेच बाळासाहेबांनी आम्हाला शिकवले आहे अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. पानवाला, टपरीवाला, रिक्षावाला याच लोकांना घेऊन बाळासाहेबांनी शिवसेना वाढवली. त्याच लोकांना तुम्ही हिणवता. बाळासाहेबांची एक डरकाळी फुटल्यानंतर देश स्तब्ध व्हायचा ते याच लोकांमुळे, स्वत:चा जीव धोक्यात घातला, कुटुंबाची पर्वा केली नाही. कितीतरी लोकांचे जीव शिवसेना वाढवण्यासाठी जीव गेले, अनेकांनी जेल भोगली, तुम्ही कुठे होता, किती केस झाल्या तुमच्यावर? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मी शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री यामागे कष्ट होते, बाळासाहेबांचे आशीर्वाद आणि तुमच्या सगळ्यांची साथ होती. श्रीकांत शिंदे डॉक्टर झाला, त्याने हॉस्पिटल करून द्या अशी एक गोष्ट मागितली. पण त्याला हॉस्पिटल देता आले नाही. एकनाथ शिंदेंनी कर्ज काढून निवडणुका लढवल्या आहेत. मिळेल ते काम केले, कष्ट केले, वयाच्या २० व्या वर्षी बेळगावच्या जेलमध्ये ४० दिवस होता. कितीतरी केसेस दाखल झाल्या. व्यासपीठावर बसलेल्या नेत्यांनी तेच भोगलेय म्हणून शिवसेना मोठी झाली, पुढे गेली असं त्यांनी सांगितले. 

तसेच शिवसेनाप्रमुखांचे विचार आपण पुढे नेण्याचे धाडस केले आहे. वाघाचे कातडे पांघरून लांडगे निघाले असं बोलता, पण तुमच्यासारख्या कोल्ह्यांची कुईकुई वाघ डरकाळी फोडत नाही तिथपर्यंत असते. २० तारखेला उठाव, क्रांतीदिन, स्वाभिमान दिन करायला देखील वाघाचे काळीज लागते. एकनाथ शिंदे राज्याचा मुख्यमंत्री असला तरी माझ्यात काही बदल झाला नाही. जसा आहे तसाच आहे. मी कालही कार्यकर्ता होतो, आजही कार्यकर्ता आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करतो असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. 

....माझ्याकडे २ पेन आहेत
सरकार पडणार, पडणार असे वारंवार बोलत होते, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आता हे सरकार पडणार नाही हे फिक्स झाल्यामुळे काल बोलले नाही. तुमच्या खोटारडेपणाला जनता साथ देणार नाही. शेतकऱ्याच्या मुलाने हेलिकॉप्टरमध्ये बसू नये, चांगल्या गाडीने फिरू नये. मी शेतकरी म्हणून शेती करतो. तुम्ही सरकार चालवायचे सोडून गाडी चालवत होतात. मी गाडीतून जेव्हा जात होतो तेव्हा फाईली घेऊन जातो, रस्त्यात कामे करतो. अडीच वर्षात जितक्या सह्या झाल्या नाहीत तितक्या १ दिवसांत करतो. अगोदरचे मुख्यमंत्री पेन ठेवत नव्हते माझ्याकडे २ पेन आहेत. मुख्यमंत्री सहायत्ता निधीचे पैसे अडीच वर्षात २ कोटी वाटले, पण मी आल्यानंतर १ वर्षात ७५ कोटी वाटले असंही शिंदेंनी सांगितले. 

आगामी निवडणुका शिवसेना-भाजपा म्हणून लढवणार
गाव तिथं शाखा, घर तिथं शिवसैनिक झाला पाहिजे, शाखेतला माणूस घरात गेला पाहिजे, घरातला माणूस शाखेत आला पाहिजे हे बाळासाहेबांनी सांगितले, मुंबईत जे कोविड काळात घोटाळे झाले, तुम्ही पैसे बनवत होता, याचा हिशोब तुम्हाला द्यावा लागेल, १५ वर्षापूर्वी रस्त्यांचा सिमेंट क्रॉंकिटचा घेतला असला तर मुंबईकरांचे साडे तीन हजार कोटी वाचले असते. आगामी सर्व निवडणुका शिवसेना-भाजपा महायुती म्हणून लढवणार आहोत, त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. सरकार काम करतंय, शासन आपल्या दारी प्रकल्प सुरू आहे. आपण त्यामधला दुवा बनून लोकांपर्यंत पोहचा, एका छताखाली सर्व दाखले मिळतायेत. हे लोकांपर्यंत पोहचावा असं आवाहनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना केले. 

Web Title: The same taunts, the same accusations, the same cassette, now change the script writer; Eknath Shinde's challenge to Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.