रुसवे फुगवे सुरूच, मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटपात प्रत्यय, मुंडे प्रकरणी प्रतिमा डागाळली
By यदू जोशी | Updated: January 21, 2025 08:10 IST2025-01-21T08:07:45+5:302025-01-21T08:10:30+5:30
Mahayuti News: विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाप्रचंड यश मिळविल्यानंतर सरकार स्थापनेपासूनची प्रत्येक गोष्ट सहज घडेल असे वाटत असताना प्रत्यक्षात मंत्रिमंडळाचा विस्तार, खातेवाटप, पालकमंत्रिपदांचे वाटप यावरून रुसवेफुगवे दिसून येत आहेत.

रुसवे फुगवे सुरूच, मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटपात प्रत्यय, मुंडे प्रकरणी प्रतिमा डागाळली
- यदु जोशी
मुंबई - विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाप्रचंड यश मिळविल्यानंतर सरकार स्थापनेपासूनची प्रत्येक गोष्ट सहज घडेल असे वाटत असताना प्रत्यक्षात मंत्रिमंडळाचा विस्तार, खातेवाटप, पालकमंत्रिपदांचे वाटप यावरून रुसवेफुगवे दिसून येत आहेत.
आधी मुख्यमंत्रिपदावरून काही दिवस घोळ चालला, मग विस्तार लांबला, नंतर खात्यांवरून शिंदेसेनेने ताणून धरल्याच्या बातम्या आल्या. आता पालकमंत्रिपदांवरून नाराजीनाट्य रंगले आहे. सरकारकडे भक्कम बहुमत असले तरी ताणतणावाचे प्रसंग अधुनमधून उद्भवत असल्याचे दिसत आहे.
मंत्रिपदापासून वंचित राहिलेल्यांची नाराजी दूर करण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून अडीच वर्षांनंतर मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेऊन बदल केले जातील, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी जाहीर केले होते. मात्र, तरीही नाराजीचे पडसाद उमटले. शिंदेसेनेचे विजय शिवतारे यांनी जात पाहून मंत्रिपदे दिली हे फार वाईट झाले, या शब्दात नाराजी व्यक्त केली.
नाराजीची मालिकाच
आपल्याला मंत्रिपद मिळत नाही हे लक्षात येताच माजी मंत्री तानाजी सावंत यांनी नागपुरात शपथविधी समारंभाला पाठ दाखविली. योग्यवेळी बोलेन असे ते म्हणाले होते.जळगाव जामोदचे पाचवेळचे भाजप आमदार डॉ. संजय कुटे यांना स्थान मिळाले नाही म्हणून त्यांच्या समर्थक पक्ष पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्याची तयारी दर्शविली होती.
अजित पवार गटाचे दत्ता भरणे यांना क्रीडा मंत्रिपद मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती. रायगडचे पालकमंत्रिपद तर तटकरे व शिंदेसेना यांच्यातील वादाचा मोठा मुद्दा बनला आहे. आमचे राजकारण संपले तरी चालेल, पण अदिती तटकरे यांना पालकमंत्री म्हणून स्वीकारणार नाही, असे शिंदेसेनेचे आ. महेंद्र थोरवे यांनी म्हटले आहे. यावरून दावेदार मंत्री भरत गोगावले कमालीचे अस्वस्थ आहेत.
मुंडे प्रकरणावरून विसंवाद
बीडमधील घटनाक्रमांवरून अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी होऊ लागली. या निमित्ताने महायुतीत विसंवाद दिसून आला.
भाजपचे आमदार सुरेश धस यांनी थेट मुंडे यांच्यावर निशाणा साधत अनेक आरोप केले. भाजपचे इतर काही आमदार मुंडे हटावमध्ये अप्रत्यक्ष सहभागी होताना दिसतात. अजित पवार गटाचे बीडचे ज्येष्ठ आमदार प्रकाश सोळंके यांनीही मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा असे म्हटले. यावरून सरकारची प्रतिमा डागाळली.
भुजबळ यांची उघड नाराजी
ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही, त्यावरून त्यांनी ‘कसला दादा अन् कसला वादा’ असा थेट हल्लाबोल अजित पवार यांच्यावर केला होता.
त्यांच्या समर्थकांनी अजित पवारांचा निषेध करत आंदोलन केले होते. अगदी परवाच्या शिर्डीतील पक्षाच्या अधिवेशनातदेखील भुजबळ यांची नाराजी लपून राहिलेली नव्हती.