शरद पवार गटाकडून उमेवारांची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता; साताऱ्यातून कोणाला संधी मिळणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 09:02 AM2024-04-03T09:02:17+5:302024-04-03T09:05:13+5:30
Lok Sabha Election 2024 : रावेर, भिवंडी, बीड, माढा आणि सातारा या जागांचे उमेदवार दुसऱ्या यादीतून जाहीर होण्याची शक्यता आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. रावेर, भिवंडी, बीड, माढा आणि सातारा या जागांचे उमेदवार दुसऱ्या यादीतून जाहीर होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून पाच उमेदवारांची पहिली यादी गेल्या मंगळवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये बारामतीतून सुप्रिया सुळे आणि शिरूरमधून अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर वर्ध्यातून अमर काळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दिंडोरीतून भास्कर भगरे यांना तर नगरमधून निलेश लंके यांना तिकीट देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, यावेळी साताऱ्याची जागा घोषित करण्यात आलेली नाही. साताऱ्यातून लढण्यास श्रीनिवास पाटील यांनी नकार दिला आहे. त्यामुळे आता दुसऱ्या यादीत साताऱ्याच्या जागेसाठी शरद पवार कुणाला उमेदवारी देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून दुसरी यादी जाहीर केली जाणार आहे. या यादीतून पाच लोकसभा जागांवरील उमेदवारींची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. यात रावेर, भिवंडी, बीड, माढा आणि सातारा या जागांचे उमेदवार दुसऱ्या यादीतून जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून दुसरी यादी जाहीर केली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
पहिल्या यादीत पाच उमेदवार जाहीर...
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत पाच उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरुरमधून अमोल कोल्हे, अहमदनगरमधून निलेश लंके, वर्ध्यातून अमर काळे आणि दिंडोरीमधून भास्करराव भगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच माढा आणि सातारा लोकसभेचे उमेदवार अद्याप जाहीर झाले नाहीत.
स्टार प्रचारक जाहीर, रोहित पवारांसह ४० जणांचा समावेश
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे. या यादीमध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अमोल कोल्हे, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, रोहित पवार, सोनिया दुहान, पूजा मोरे यांच्यासह ४० नेत्यांचा समावेश आहे.