स्वाभिमानी ऊसतोड बंद आंदोलन कराडात चिघळले, इंदोलीत अज्ञाताने ऊस ट्रॅक्टर पेटवला
By प्रमोद सुकरे | Published: November 17, 2022 11:02 AM2022-11-17T11:02:06+5:302022-11-17T11:02:33+5:30
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने १७ व १८ नोव्हेंबरला दोन दिवसाचे राज्यभर ऊसतोड बंद आंदोलन पुकारले आहे.
कराड
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने १७ व १८ नोव्हेंबरला दोन दिवसाचे राज्यभर ऊसतोड बंद आंदोलन पुकारले आहे. हे आंदोलन कराड तालुक्यात चिघळले असून इंदोली येथे बुधवारी रात्री उशिरा अज्ञाताने ऊस वाहतूक करणारा एक ऊस ट्रॅक्टर पेटवून दिला. त्यामुळे पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्याला संशयीत म्हणून ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, साखर कारखानदारांनी विना कपात एक रकमी एफ आर पी द्यावी. हंगाम संपल्यावर ३५० रुपये द्यावे. अशी स्वाभिमानीची मागणी आहे. मात्र याकडे कोणीच हवे तसे लक्ष देत नाही. म्हणूनच सरकारचे लक्ष वेधण्यासाठी १७ व १८ नोव्हेंबरला राज्यभर लाक्षणिक ऊसतोड बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे
या २ दिवसात शेतकऱ्यांनी ऊस तोडी घेऊ नयेत. रस्त्यावरून ऊस वाहतूक करु नये. आंदोलनाला सहकार्य करावे. असे आवाहन संघटनेने केले होते.
आमच्या या आंदोलनाला अनेक ऊसतोड वाहतूक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आमच्यात नेहमी सारखा संघर्ष होणार नाही.असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.
पण गुरुवारी रात्री इंदोली येथील उसाने भरलेला ट्रॅक्टर अज्ञाताने पेटवून दिल्याने हे आंदोलन चिघळले आहे. त्याचबरोबर पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दादासो यादव यांना या बाबत ताब्यात घेतले असल्याचे स्वाभिमानिच्या कार्यकर्ते्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. दरम्यान यामुळे कराड तालुक्यातील वातावरण तापले आहे