शिंदे गटात कुरबुरी! शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रोखला मुख्यमंत्र्यांचा ताफा, सह्याद्रीमधून बाहेर पडत असतानाच गराडा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 10:48 AM2024-07-23T10:48:46+5:302024-07-23T10:51:02+5:30
Eknath Shinde News: कुलाबा मतदारसंघातील शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांचा ताफा रोखला होता. स्थानिक विभागअध्यक्ष दिलीप नाईक यांना पदावरून हटवण्याची मागणी करण्यात आली. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
मुंबईतील लोकसभेतील पराभवानंतर शिंदे गटात कुरबुरी सुरु झाली आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांविरोधातील रोष बाहेर येऊ लागला असून सोमवारी रात्री सह्याद्री अतिथीगृहामधून बाहेर येत असताना त्या भागातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शिंदे यांचा ताफा अडविला. यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली.
कुलाबा मतदारसंघातील शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांचा ताफा रोखला होता. स्थानिक विभागअध्यक्ष दिलीप नाईक यांना पदावरून हटवण्याची मागणी करण्यात आली. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये काही शिवसैनिक दक्षिण मुंबईला वाचवा असे सांगताना ऐकायला येत आहे.
शिवसेना पक्षातील अंतर्गत नाराजी पहिल्यांदाच अशाप्रकारे रस्त्यावर उघड झाल्याने येत्या विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत शिंदेंची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
एकीकडे मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने शिंदेंसोबत गेलेले आमदार नाराज आहेत. अनेकदा या आमदारांनी नाराजी बोलून दाखविली आहे. गेल्या अडीज वर्षांपासून शिंदे सरकारने सोबत आलेल्या आमदारांसाठी मंत्रिमंडळ विस्तार केलेला नाही. महामंडळांवरही नियुक्त्या केलेल्या नाहीत. आता जेमतेम दोन महिने राहिले आहेत. सरकार बहुमतात असताना राष्ट्रवादीला सोबत घेत आपल्या वाट्याची मंत्रिपदे अजित पवार गटाला देण्यात आल्याचे शल्य या आमदारांच्या मनात आहे. परंतू आता दोन महिने राहिलेत, या उरलेल्या काळासाठी तर मंत्रिपद मिळूदे म्हणून अनेक इच्छुक आमदार डोळे लावून आहेत.