शिवसेना पक्षाच्या घटनेतच पक्षप्रमुखपदाचा उल्लेख नाही, गटनेता, प्रतोद निवडीचे अधिकार नसल्याचा शिंदे गटाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 11:07 AM2023-11-29T11:07:23+5:302023-11-29T11:09:06+5:30
Shiv Sena: केंद्रीय निवडणूक आयोगाकडे नाेंद झालेल्या शिवसेनेच्या घटनेत पक्षप्रमुखपदाचा उल्लेखच नाही. उद्धव ठाकरे यांना पक्षाचे नेते व मुख्य प्रतोद निवडीचे कोणतेही अधिकार नव्हते, असा जोरदार दावा शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांच्याकडून मंगळवारी पुन्हा करण्यात आला.
मुंबई - केंद्रीय निवडणूक आयोगाकडे नाेंद झालेल्या शिवसेनेच्या घटनेत पक्षप्रमुखपदाचा उल्लेखच नाही. उद्धव ठाकरे यांना पक्षाचे नेते व मुख्य प्रतोद निवडीचे कोणतेही अधिकार नव्हते, असा जोरदार दावा करतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरून हटविण्याचा ठरावच बनावट असल्याचा दावा शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांच्याकडून मंगळवारी पुन्हा करण्यात आला.
शिवसेना गटनेतेपदावरून शिंदे यांना हटवून आमदार अजय चौधरी यांची मुख्य प्रतोदपदी निवड करण्यात आली. २१ जून २०२२ रोजी झालेल्या या ठरावावर शिंदे गटाच्या वकिलांकडून ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची उलटतपासणी सुरू आहे. प्रभूंवर जेठमलानी यांच्याकडून प्रश्नांचा भडिमार सुरू असून काेणत्या आधारावर तुम्ही हा ठराव केला, असा थेट प्रश्न त्यांना विचारण्यात आला.
मी ‘नॅशनल’
राष्ट्रीय शक्ती या शब्दाचे भाषांतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ‘नॅशनल पॉवर’ असे केले. त्यावर महेश जेठमलांनी यांनी हास्य करीत सुनील प्रभूंना ‘नॅशनल’ की ‘अँटी नॅशनल’ असा सवाल केला, त्यावर एका क्षणाचाही विलंब न लावता ‘मी नॅशनल’ असे उत्तर प्रभूंनी दिले.
..या शक्यतेने नोटिसा
प्रतिज्ञापत्राच्या पहिल्याच ओळीत पक्षांतर घडवून सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्याचे कोणत्या आधारावर नमूद केले असे विचारत जेठमलानी यांनी खातरजमा न केलेल्या बातम्यांच्या आधारावर आमदारांना बैठकीच्या नोटीस काढण्यात आल्याचा दावा केला. यावर प्रभू यांनी सूरतला गेलेल्या आमदारांकडून आपल्यामागे राष्ट्रीय शक्ती असल्याचा दावा करण्यात आल्याने सरकार अस्थिर होईल या शक्यतेने नोटिसा काढल्याचे
स्पष्ट केले आहे.
आमदार प्रतोदपदावरून हटवूच शकत नाहीत : सुनील प्रभू
मुख्य प्रतोद म्हणून ३१ आमदारांनी तुम्हाला पदावरून काढून टाकले. त्यामुळे तुमचा व्हीप लागूच होऊ शकत नाही, या जेठमलानी यांच्या दाव्याला प्रभू यांनी तेवढ्याच शिताफीने उत्तर दिले. मुख्य प्रतोदपदावरून मला हटवण्याचा अधिकार आमदारांना नाही माझी नियुक्ती पक्षप्रमुखांनी केली आहे. पदावरून काढण्याचेही अधिकार पक्षप्रमुखांचे आहेत, असे ते म्हणाले.
‘दिलीप लांडे यांची त्या ठरावावरील सही खोटी’
२२ जून २०२२ रोजी वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून हटवण्याच्या ठरावाला दिलीप लांडे यांनी अनुमोदन दिले नाही. त्यामुळे झालेला ठराव खोटा आहे आणि दिलीप लांडे यांनी ठरावावरील सही आणि त्या दिवशीच्या हजेरीपटावरील सही पूर्णपणे वेगळी असल्याचा दावा जेठमलानी यांनी केला. यावर हे खोटे असल्याचे उत्तर सुनील प्रभू यांनी दिले.