निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2024 10:52 AM2024-11-17T10:52:04+5:302024-11-17T10:53:04+5:30
परंडा मतदारसंघातून गुरुदास कांबळे हे अपक्ष उमेदवार आहेत. त्यांना चपला हे निवडणूक चिन्ह आयोगाकडून देण्यात आले आल्याने हा विषय चर्चेचा झाला आहे.
धाराशिव : परंडा विधानसभा मतदारसंघ हा निवडणूक लागल्यापासूनच चर्चेत राहिला आहे. आघाडीत उमेदवारीवरून झालेल्या गोंधळामुळे तर आता निवडणुकीच्या चिन्हामुळे. येथील एका उमेदवाराला ‘चपला’ निशाणी मिळाली आहे. त्यांनी आयोगाला पत्र लिहून मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रात चप्पल घालून येणाऱ्यांवर कारवाईची अजब मागणी केली. मात्र, आयोगाने ही मागणी फेटाळून लावली आहे.
परंडा मतदारसंघातून गुरुदास कांबळे हे अपक्ष उमेदवार आहेत. त्यांना चपला हे निवडणूक चिन्ह आयोगाकडून देण्यात आले आल्याने हा विषय चर्चेचा झाला आहे.
ते नियमित वापराचे साधन...
- चपला या नियमित वापराचे साधन आहेत. त्यामुळे मतदान केंद्र परिसरात त्यांचा वापर थांबवता येऊ शकत नाही.
- त्यामुळे कांबळेंची मागणी फेटाळण्यात आल्याचे सहायक निवडणूक अधिकारी जयवंतराव पाटील यांनी सांगितले.
पत्रच आहे तसे, मग चर्चा तर होणारच ना भाऊ...
दरम्यान, मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या २०० मीटर परिघात निवडणूक चिन्ह बाळगणे, दर्शवणे यावर प्रतिबंध घातला जातो. या नियमाचा दाखला देत गुरुदास कांबळे यांनी मतदान केंद्रावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही चपला घालू नयेत, घातल्यास त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी लेखी पत्राद्वारे केली.
शिवाय, मतदानासाठी येणाऱ्या नागरिकांनाही त्या घालता येणार नाहीत. त्यामुळे पायाला दुखापत होऊ नये, यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणीही कांबळे यांनी पत्राद्वारे केली. या त्यांच्या पत्राची चांगलीच चर्चा रंगली आहे.