दुर्गंधी डेपो ‘बस’ झाले; ५७७ पैकी ३९४ स्थानके ‘नापास’, सर्वेक्षणातील वास्तव
By विलास गावंडे | Published: October 11, 2023 11:04 AM2023-10-11T11:04:13+5:302023-10-11T11:06:03+5:30
‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान’ संपूर्ण महाराष्ट्रात राबविले जात आहे. या अंतर्गत सर्वेक्षणाची पहिली फेरी मे व जून २०२३ या कालावधीमध्ये पार पडली.
यवतमाळ : प्रवाशांना चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. परंतु, स्थानिक प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांना असुविधांचा सामना करावा लागतो. राज्यातील ५७७ पैकी ३९४ बसस्थानकांचे चित्र अतिशय वाईट असल्याचे वास्तव पुढे आले आहे.
‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान’ संपूर्ण महाराष्ट्रात राबविले जात आहे. या अंतर्गत सर्वेक्षणाची पहिली फेरी मे व जून २०२३ या कालावधीमध्ये पार पडली.
एका विभागाच्या सर्वेक्षण समितीने दुसऱ्या विभागातील बसस्थानकांची पाहणी करून मूल्यांकन केले. चांगला, मध्यम आणि वाईट असा शेरा या समित्यांनी आपल्या मूल्यांकनात दिला.
दुसरी फेरी सुरू
- आता सर्वेक्षणाची दुसरी फेरी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये पहिल्या फेरीत वाईट स्थितीत आढळलेल्या बसस्थानकांमध्ये काही बदल झालेला आढळतो काय, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
- पहिल्या फेरीत ज्या चमूने पाहणी केली, त्यांच्याकडे आता दुसऱ्या विभागाच्या सर्वेक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे.
अशी आहे स्थिती -
- ६९ ठिकाणची बसस्थानके चांगल्या स्थितीत आढळल्याचा शेरा समित्यांनी दिला आहे.
- १२% ही एकूण संख्येच्या तुलनेत सुंदर बसस्थानकांची संख्या आहे.
- ११४ बसस्थानकांना कामात सुधारणा करण्याची संधी आहे.