'तो' साप संजय राऊतांच्या तोंडाला चावायला हवा होता- भरत गोगावले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 03:59 PM2023-07-12T15:59:47+5:302023-07-12T16:00:20+5:30
राऊतांच्या पत्रकार परिषदेत साप आल्याची चांगलीच चर्चा रंगली आहे
Sanjay Raut Snake: संजय राऊत आणि सकाळची पत्रकार परिषद हे समीकरण ठरलेले आहे. रोजच्या प्रमाणे आजही संजय राऊत पत्रकार परिषदेत आले पण त्याच वेळी एक वेगळा प्रकार घडला. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भांडूपमधील घरात अचानक साप निघाल्याने सर्वांचीच धावपळ झाली. राऊत हे नेहमीप्रमाणे पत्रकार परिषद घेत होते. त्याचवेळी, सकाळच्या सुमारास ही साप निघाल्याची घटना घडली. साहजिकच ही बातमी नंतर भरपूर पसरली आणि त्यावर काही राजकीय लोकांनीही प्रतिक्रिया दिल्या. यात शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले हे राऊतांबद्दल खोचक प्रतिक्रिया दिली.
"संजय राऊतांच्या तोंडाला साप चावायला हवा होता. तो त्यासाठीच निघाला असेल. ते खूप बोलतात त्यामुळेच असं व्हायला हवं होतं. संजय राऊत यांच्या घरामध्ये निघालेला साप त्यांच्या तोंडाला डसायला हवा होता. कारण अति तिथे माती हे ठरलेलं आहे. माणसाने किती बोलावं यासाठी प्रत्येकाला मर्यादा आहे. त्यांनी मर्यादा पाळली पाहिजे. कदाचित साप त्यांना इशारा द्यायलाच आला असेल", असे भरत गोगावले म्हणाले.
दरम्यान, खासदार संजय राऊत यांची सकाळची पत्रकार परिषद सुरू असतानाच अगदी त्यांच्या खुर्चीच्या जवळच एक साप आल्याची घटना घडली. पांदीवड प्रकारचा हा बिनविषारी साप होता, पण साप निघाल्यामुळे लवकरच पत्रकार परिषद आटोपण्यात आली. त्यानंतर, सर्पमित्राला बोलावून हा साप पकडण्यात आला. सर्पमित्राने बॅगमध्ये घालून साप नेला. मात्र, या घनटेची पत्रकारांमध्ये आणि त्यानंतर माध्यमांत चांगलीच चर्चा रंगली.