भाजपाला पाडायला निघालेल्यांचा मुलगा ग्रामपंचायतीत पडला, रणजितसिंहांची जयसिंहराव मोहिते पाटलांवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2024 05:17 PM2024-05-04T17:17:04+5:302024-05-04T17:18:39+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: भाजपा उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी जयसिंह मोहिते पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भाजपा उमेदवाराला पाडायला निघालेल्यांचा मुलगाच ग्रामपंचायत निवडणुकीत पडला, असा टोला रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी जयसिंगराव मोहिते पाटील यांना लगावला.
माढा लोकसभा मतदारसंघात भाजपा उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना आव्हान देत धैर्यशील मोहिते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे येथील लढत ही चुरशीची झाली आहे. त्यात दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत असल्याने येथील राजकीय वातावरणही तापलं आहे. दरम्यान, भाजपा उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी जयसिंह मोहिते पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भाजपा उमेदवाराला पाडायला निघालेल्यांचा मुलगाच ग्रामपंचायत निवडणुकीत पडला, असा टोला रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी जयसिंगराव मोहिते पाटील यांना लगावला.
माढा लोकसभा मतदारसंघातील एका प्रचारसभेला संबोधित करताना रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जयसिंहराव मोहिते पाटील यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, हॅव पाडू, त्यांव पाडू करणाऱ्या मोहिते पाटील यांचंच पोरगं मागच्या वर्षी ग्रामपंचायत निवडणुकीत पडलं आहे. विजयसिंह मोहिते पाटील यांचं नेतृत्व चांगलं होतं. मात्र पोरांनी सगळं वाटोळं केलं, अशी टीका रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केली.
शरद पवार यांनी माढ्याचे खासदार बनल्यानंतर माढ्याचं पाणी बारामतीला पळवलं. मात्र मात्र शरद पवार यांनी पळवलेलं पाणि देवेंद्र फडणवीस यांनी माघारी आणलं, असा दावाही रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी केला.
दरम्यान, माढा लोकसभा मतदारसंघात २०१९ मध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ८५ हजार मतांनी विजय मिळवला होता. मात्र यावेळच्या निवडणुकीत भाजपा सोडून शरद पवार गटात दाखल झालेले धैर्यशिल मोहिते पाटील यांचं आव्हान रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासमोर आहे. तसेच या मतदारसंघातील काही गटतट मोहिते पाटील यांच्या मागे उभे राहिले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांची कसोटी लागण्याची शक्यता आहे.