राज्य सांस्कृतिक पुरस्कार वितरणाला मिळाला मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2023 10:29 AM2023-04-08T10:29:07+5:302023-04-08T10:29:27+5:30
दोन वेळा रद्द झालेला सोहळा १० एप्रिलला
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे दिल्या जाणाऱ्या राज्य सांस्कृतिक पुरस्कार वितरण सोहळ्याला अखेर मुहूर्त मिळाला आहे. येत्या १० एप्रिल रोजी मुंबईत प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. यापूर्वी या पुरस्कारांच्या वितरणाची तारीख दोनदा जाहीर होऊन ती आयत्या वेळी रद्द केल्याने त्याचा मनस्ताप पुरस्कारप्राप्त कलावंतांना सहन करावा लागला होता.
राज्य सांस्कृतिक पुरस्कार २०२० व २०२१ अशा दोन वर्षांच्या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. एप्रिल २०२२ मध्ये या पुरस्कारांची घोषणा झाली होती.
२७ मार्च रोजी प्रसिद्ध केलेले वृत्त
- या पुरस्कारांचे वितरण सोमवार, २७ मार्च रोजी मुंबईत रवींद्र नाट्य मंदिरात होईल, असा निरोप पुरस्कारप्राप्त कलावंतांना देण्यात आला होता. त्यानुसार काही कलावंत मुंबईतही आले. मात्र, आदल्या दिवशी म्हणजे हा सोहळा रद्द झाल्याचा निरोप या कलावंतांना देण्यात आला.
- यापूर्वी डिसेंबर २०२२ मध्ये नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असताना हा सोहळा घेण्याचे ठरले होते. तेव्हाही कलावंतांना निरोप देण्यात आले. कलावंतांनी रेल्वेचे बुकिंगही केले. मात्र, ऐनवेळी हा सोहळा रद्द केला.