राज्याला महिला मुख्यमंत्री हव्या पण रश्मी ठाकरेंचं नाव नको; किशोरी पेडणेकर असं का बोलल्या?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 09:52 AM2024-09-18T09:52:37+5:302024-09-18T09:57:35+5:30

राज्याला पहिल्या महिला मुख्यमंत्री कधी मिळणार हा प्रश्न कायम राजकीय वर्तुळात चर्चेत असतो. या शर्यतीत अनेक नावे पुढे येतात. 

The state needs a woman CM, Rashmi Thackeray not interested in Politics;- Kishori Pednekar | राज्याला महिला मुख्यमंत्री हव्या पण रश्मी ठाकरेंचं नाव नको; किशोरी पेडणेकर असं का बोलल्या?

राज्याला महिला मुख्यमंत्री हव्या पण रश्मी ठाकरेंचं नाव नको; किशोरी पेडणेकर असं का बोलल्या?

नागपूर - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मुख्यमंत्रिपदावरून चर्चेला उधाण आलं आहे. उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मविआनं मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करावा अशी मागणी केली होती. मात्र काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं ही मागणी धुडकावल्यानंतर आता ठाकरे गटानेही या मागणीचा जोर कमी केला आहे. त्यात अधूनमधून राज्यात महिला मुख्यमंत्रिपदावरही बोललं जाते. त्यात रश्मी ठाकरे यांचे नावही यापदासाठी चर्चेत येते. त्यावरूनच ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी रश्मी ठाकरेंना राजकारणात रस नाही असं सांगितले आहे.

राज्याला महिला मुख्यमंत्री मिळणार का या पत्रकारांच्या प्रश्नावर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, रश्मी ठाकरे यांनी कधीही राजकारणा इंटरेस्ट घेतलेला नाही. त्या त्यांच्या पतीच्या सोबत असतात. याचा अर्थ त्या राजकारणात आहेत असं होत नाही. त्यामुळे राज्यात महिला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे पण कारण नसताना रश्मी वहिनीचं नाव असता कामा नये असं त्यांनी म्हटलं आहे. नागपूरात पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. 

राज्याला कधी मिळणार पहिल्या महिला मुख्यमंत्री?

गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणात महिला मुख्यमंत्री हा कायम चर्चेचा विषय राहिला. आजपर्यंत राज्यात एकही महिला मुख्यमंत्री झाली नाही. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीवेळी, सत्तास्थापनेवेळी मुख्यमंत्रिपदाबाबत अनेक नावे चर्चेत येत असतात. मागील काळात पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यासह इतर नावेही चर्चेत राहिली. रश्मी ठाकरे या उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आहेत. त्यांनी सक्रीय राजकारणात भाग घेतला नसला तरी पक्षसंघटनेत रश्मी ठाकरेंचं लक्ष असते असं बोललं जाते. 

सुप्रिया सुळे या दिल्लीत खासदार म्हणून निवडून गेल्या असल्या तरी ज्यावेळी मुख्यमंत्रिपदाची चर्चा होते तेव्हा त्यांचेही नाव आघाडीवर असते. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आता शरद पवार आणि अजित पवार वेगळे झालेत. त्यात सुप्रिया सुळे प्रामुख्याने राज्यात सक्रीयपणे फिरताना दिसत आहेत. त्यामुळे भविष्यात सुप्रिया सुळे यांना शरद पवारांकडून मुख्यमंत्रिपदासाठी पुढे आणले जाईल अशी चर्चा आहे. जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हणून पंकजा मुंडे यांचे बॅनर्स लागलेले राज्यात दिसतात. महाराष्ट्रात भाजपाची सत्ता आल्यानंतर पंकजा मुंडे यांचे नाव चर्चेत आले. मात्र त्यांना मुख्यमंत्री केले नाही. परंतु ओबीसी, वंजारी समाजाचं नेतृत्व करणाऱ्या पंकजा मुंडे यादेखील राज्यातील महिला मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत कायम असतात. 

Web Title: The state needs a woman CM, Rashmi Thackeray not interested in Politics;- Kishori Pednekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.