बाळासाहेब ठाकरेंच्या 'त्या' कॉलचा किस्सा; राजन विचारेंचा जुन्या आठवणींना उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 09:11 AM2023-08-03T09:11:07+5:302023-08-03T09:12:07+5:30

मातोश्रीत मोठ्या साहेबांना भेटण्यासाठी जाताना मी आनंद दिघेंसोबत कायम असायचो अशी आठवणही विचारेंनी सांगितली.

The story of Balasaheb Thackeray's 'that' call; Bring back old memories of Rajan thoughts | बाळासाहेब ठाकरेंच्या 'त्या' कॉलचा किस्सा; राजन विचारेंचा जुन्या आठवणींना उजाळा

बाळासाहेब ठाकरेंच्या 'त्या' कॉलचा किस्सा; राजन विचारेंचा जुन्या आठवणींना उजाळा

googlenewsNext

मुंबई - आज मी एकटा नाही तर असंख्य शिवसैनिक आहे. १९६७ साली शिवसेनेची स्थापना झाली. त्यानंतर पहिली सत्ता ठाण्याने शिवसेनेला दिली. १९७४ मध्ये थेट नगराध्यक्ष म्हणून सतीश प्रधान निवडून आले. शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेना अशी ओळख झाली. आम्हाला जे काही मिळाले ते बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने मिळाले. शिवसेना ही ४ अक्षरे काढली तर तुम्हाला कुणी विचारणार नाही. लोकं पक्षप्रमुखांकडे बघून मतदान करतात तुम्हाला मते देत नाहीत. हे श्रेय बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे आहे असं खासदार राजन विचारेंनी सांगितले.

खासदार राजन विचारे म्हणाले की,  उभ्या वादळात कसं उभं राहायचे हे धर्मवीर आनंद दिघेंमुळे शिकलो. मी जो काही आता उभा आहे तो त्यांच्या विचारानेच. ३१ वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून मी काम करतोय. ज्यावेळी ठाण्यात विकास सुरू झाला तेव्हा मी सभागृह नेता होतो. मी प्रत्येक आयुक्तांसोबत काम करत आलोय. आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते यांना गल्ली ते दिल्ली जाण्याची संधी मिळाली ती दिघेंमुळे. टीमवर्क म्हणून तेव्हा काम करायला लागायचे. मी महापौर असताना रात्री कितीही उशीर झाला तरी सकाळी ७ वाजता ३०-३२ पेपर घेऊन बसायला लागायचे. जर टॉवरवरील घड्याळाचे काटे बंद आहेत. तर त्यालाही उत्तर द्यायला लागायचे. ९.३० सुमारास बाळासाहेब ठाकरेंचा फोन यायचा. शहरातील प्रत्येक विषयाकडे बारकाईने लक्ष असायचे. त्यामुळे आमच्यासारखे कार्यकर्ते इथपर्यंत येऊन पोहचलेत असं त्यांनी म्हटलं.

त्याशिवाय २४ तासांतील १६ तास मी आनंद दिघेंसोबत असायचो. कॉलेजसुद्धा अर्धवट सोडलं. माझे वडील शिपिंग कॉर्पोरेशनमध्ये कामाला होते. कपबशा धुवून शिक्षण घेत पदवीधर झाले होते. ब्रिटीश कंपनीत ३-४ मराठी अधिकारी होते त्यात माझे बाबा होते. शिवसेना विचाराने आम्ही प्रेरित झालो होतो. ४ दिवस घरी यायचो नाही. मुरबाड, पालघर, वाडा, जव्हार याठिकाणी जायचो. दिघेंसोबत जात असल्याने आई वडिलांना विश्वास होता. नंदकुमार शेडगे, विनोद सावे असे सहकारी असायचे. मातोश्रीत मोठ्या साहेबांना भेटण्यासाठी जाताना मी आनंद दिघेंसोबत कायम असायचो अशी आठवणही विचारेंनी सांगितली.

दरम्यान, शिवसैनिकांची घरे तोडली, उद्योगधंदे बंद केलेत. शाखा तोडल्या. महिला बचत गटाच्या झुणका भाकर केंद्रे बंद केली. अख्खी पोलीस यंत्रणा तुम्ही या कामाला लावलेत. अनेकांचे पोलीस संरक्षण काढून टाकलंय. हे गद्दारी करून सरकारमध्ये बसलेत. हे जास्त दिवस टिकणार नाही. कायदा-सुव्यवस्था राखण्याचे काम पोलिसांनी केले पाहिजे पण हे न करता गेल्या वर्षभरात केवळ एकच गुन्हा दाखल झाला. भरदिवसा महाराष्ट्रात कोयत्याने वार करतायेत मग पोलीस काय करतायेत असं खासदार राजन विचारेंनी खडसावलं.

 

Web Title: The story of Balasaheb Thackeray's 'that' call; Bring back old memories of Rajan thoughts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.