विरोधकांच्या इंडिया आघाडीला बळ, महाराष्ट्रातील १३ पक्षांचा पाठिंबा, राज्यातील समीकरणं बदलणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 04:26 PM2023-08-22T16:26:08+5:302023-08-22T16:27:26+5:30
Jayant Patil: पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत केंद्रातील मोदी सरकारला पराभूत करण्यासाठी काँग्रेससह बहुतांश विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली आहे.
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत केंद्रातील मोदी सरकारला पराभूत करण्यासाठी काँग्रेससह बहुतांश विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. या इंडिया आघाडीमध्ये महाराष्ट्रामधील काँग्रेससह शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) हे सहभागी झालेले आहे. दरम्यान, महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीची ताकद आणखी वाढणार आहे. कारण महाराष्ट्रातील १३ पक्षांचा सहभाग असलेली प्रागतिक आघाडी इंडिया आघाडीसोबत असल्याची माहिती समोर आली आहे. शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी ही माहिती दिली आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर इंडिया आघाडीमधील सहभागाबाबत माहिती देताना जयंत पाटील म्हणाले की, प्रागतिक आघाडी ही महाविकास आघाडीमध्ये आहे आणि महाविकास आघाडी ही इंडिया आघाडीमध्ये आहे. त्यामुळे आम्हीही इंडिया आघाडीमध्ये आहोत. आम्ही इंडिया आघाडीमध्ये नाही आहोत, असं कुणीही म्हटलेलं नाही. तसं विधानही कुणीही केलेलं नाही, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, आम्ही प्रागतिक आघाडीमधील पक्ष एकत्रितपणे यांच्याशी बोलणार आहोत. एकेकट्याने बोलणार नाही. जे आमचे १३ पक्ष आहेत ते मिळून एकत्र बोलणार आणि जागा लढवण्याबाबत विचारविनिमय करणार. तसेच आम्हाला ज्या जागा मिळतील त्या आम्ही प्रागतिक आघाडी म्हणून लढवणार आहोत. मात्र जागेबाबत आम्ही कुठलेही मतभेद करणार नाही. तीच भूमिका शरद पवार यांनी आता मांडली आहे. जो निवडून येणार आहे तो उमेदवार, ज्याची निवडून येण्याची क्षमता आहे त्याच्याबाबत विचारविनिमय करून आपण तिकीट दिलं पाहिजे, अशी शरद पवार यांची भूमिक आहे. तीच भूमिका आमची आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.