चंद्रयान मोहिमेचं यश हा देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 18:33 IST2023-08-23T18:24:37+5:302023-08-23T18:33:15+5:30
भारतीयांना असलेली यशाची खात्री आणि शास्त्रज्ञांचे कर्तृत्व आणि त्यांच्या बुद्धिमत्तेवरील अढळ विश्वास आज सार्थ ठरला आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदेंनी दिली.

चंद्रयान मोहिमेचं यश हा देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई - भारत आज महासत्तेकडे वाटचाल करीत आहे. त्यामुळे चंद्रयानाचे यश हे देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा ठरले आहे. या मोहिमेमुळे भारताचे अवकाश संशोधनातील श्रेष्ठत्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समस्त भारतीयांचं आणि शास्त्रज्ञांचं अभिनंदन केले.
भारताच्या चंद्रयानाचं विक्रम हे लँडर यशस्वीरित्या उतरल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या उत्स्फूर्त भावना व्यक्त केल्या. इस्त्रोच्या कमांड सेंटरमधून सुरु असलेले प्रक्षेपण वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी पाहिले. मुख्यमंत्र्यांसह उपस्थित सर्वानीच आनंदाने टाळ्या वाजवून ही मोहीम फत्ते झाल्याबद्धल आनंद साजरा केला. तसेच उपस्थितांना पेढेही वाटण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा हा आजचा क्षण आहे. या यशाने सर्व भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला आहे. देशातील सर्व शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, संशोधकांचं हे यश आहे असं त्यांनी म्हटलं.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिशादर्शक नेतृत्वाचं आणि पाठिंब्याचं बळ शास्त्रज्ञांच्या पाठीशी आहे. श्रीहरीकोटा येथून १४ जुलैला ‘चंद्रयान ३’ हे चंद्राच्या दिशेने झेपावलं. अनेक अवघड टप्पे त्याने यशस्वीपणे पार केले. 'चंद्रयान ३’ कडून वेळोवेळी पाठवण्यात आलेली छायाचित्रे आणि यानाची सकारात्मक प्रगती ही आजच्या या यशाची ग्वाही देत होते. भारतीयांना असलेली यशाची खात्री आणि शास्त्रज्ञांचे कर्तृत्व आणि त्यांच्या बुद्धिमत्तेवरील अढळ विश्वास आज सार्थ ठरला आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदेंनी दिली.
प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा हा आजचा क्षण आहे...
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 23, 2023
बुद्धिवंतांचा देश अशी ओळख असलेल्या आपल्या भारताने आज हे देदिप्यमान, ऐतिहासिक यश मिळवलं आहे…
‘चंद्रयान ३’ मोहिमेमधील विक्रम लॅन्डर चंद्रावर उतरले आणि या मोहिमेतील सर्वांत महत्त्वाचा टप्पा आज पार पडला…
या यशाने सर्व… pic.twitter.com/lMQ41GvVAT
दरम्यान, परवा रशियाचे ‘लुना-२५’ यान चंद्रावर उतरण्याआधीच कोसळले होते, त्या पार्श्वभूमीवर आज ‘चंद्रयान ३’ चे यश हे संपूर्ण जगात उजळून निघाले आहे असेही मुख्यमंत्री आपल्या प्रतिक्रियेत म्हणाले.