यंदाचे गणेश विसर्जन दणक्यात; ढोल-ताशा वादनावरील निर्बंधांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 05:36 AM2024-09-13T05:36:16+5:302024-09-13T05:36:51+5:30
‘एनजीटी’ने ढोल-ताशा-झांज पथकांमध्ये ३० पेक्षा अधिक सदस्य असणार नाहीत, असे आदेश दिले होते, ‘एनजीटी’ने घातलेल्या निर्बंधांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती
पुणे/नवी दिल्ली - गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकीमध्ये आता कितीही ढोल-ताशा पथकांची संख्या असणार आहे. त्यावरील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. परिणामी विसर्जन मिरवणुकीचा वेळ लांबण्याची शक्यता आहे. ढोल-ताशा वादनावरील निर्बंधांना स्थगिती दिल्याच्या निर्णयाचे ढोल-ताशा पथकांनी स्वागत केले आहे. तसेच, यंदाचे ढोल वादन चांगले होईल, अशी भावना गणेशोत्सव मंडळांनी व्यक्त केली आहे.
पुण्याचा गणेशोत्सव हा जगप्रसिद्ध आहे. गणेश विसर्जन मिरवणूक हा तर या उत्सवाचा परमोच्च बिंदू असतो. त्या मिरवणुकीत ढोल-ताशा वादन पाहणे हा एक अनुपम सोहळा असतो. परंतु, राष्ट्रीय हरित लवादाच्या (एनजीटी) एका निर्णयामुळे ढोल-ताशा पथकांच्या उत्साहाला मर्यादा आल्या होत्या. मात्र आता सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी मोठा निर्णय घेऊन ढोल-ताशा पथकांना दिलासा दिला आहे.
‘एनजीटी’ने ढोल-ताशा-झांज पथकांमध्ये ३० पेक्षा अधिक सदस्य असणार नाहीत, असे आदेश दिले होते. या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जे. बी. पारदीवाला, मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर गुरूवारी सुनावणी झाली. तेव्हा एनजीटीचा मर्यादेवरील निर्णयाला स्थगिती दिली. परंतु, उत्सवादरम्यान ध्वनी प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी एनजीटीने जारी केलेल्या इतर निर्देशांना विरोध नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.
एनजीटीचे हे होते आदेश
‘एनजीटी’ने ३० ऑगस्ट ढोल-ताशा पथकांबाबत निर्बंध घालण्याचे आदेश दिले होते. या आदेशात म्हटले आहे की, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने विसर्जन मिरवणुकीदरम्यान रिअल टाईम ध्वनी प्रदूषण मोजावे. पोलिसांनी ढोल-ताशा-झांज पथकात ३० पेक्षा जास्त सदस्य नसावेत, याची खात्री करावी. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास पोलिसांनी साहित्य जप्त करावे, असेही आदेशात ‘एनजीटी’ने म्हटले होते.
मंडळांकडून स्वागत अन् पथकांमध्ये उत्साह
पुणे हे गणेशोत्सवाचे केंद्रबिंदू असल्याने इथे निर्बंध आणणे योग्य नव्हते. हरित लवादाने आमचे म्हणणे ऐकून घेतले नव्हते. एकतर्फी निर्णय झाला होता. पण आता सरन्यायाधीशांनी स्थगिती दिल्याने सर्वांना दिलासा मिळाला. तरी ५ तारखेला सुनावणी असेल तेव्हा आम्ही म्हणणे मांडू.
- पराग ठाकूर, अध्यक्ष, ढोल-ताशा पथक महासंघ
आवाजाचे प्रदूषण डीजेमुळे होते. ढोल-ताशा हे पारंपरिक वाद्य आहेत. तो आपल्या संस्कृतीचा भाग आहे. त्यामुळे खूप गोंगाट किंवा प्रदूषण होत नाही. - कृणाल घारे, सामाजिक कार्यकर्ते