नेत्याच्या मुलासाठी यंत्रणा वेगाने धावली पण बेपत्ता ८ हजार जणांचा शोध कोण घेणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 06:19 IST2025-02-13T06:18:53+5:302025-02-13T06:19:27+5:30
नेत्यासह उद्योजकाच्या मुलाचे अपहरण झाल्यावर यंत्रणा काय करते, हे माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या प्रकरणावरून समोर आले आहे.

नेत्याच्या मुलासाठी यंत्रणा वेगाने धावली पण बेपत्ता ८ हजार जणांचा शोध कोण घेणार?
सोमनाथ खताळ
बीड : माजी मंत्री तथा आमदार तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण झाल्याचे समजून बँकॉकला जाणारे विमान परत फिरविले. त्यासाठी यंत्रणा आणि संपूर्ण सरकार कामाला लागले. परंतु, राज्यातील रहिवासी असलेले ८ हजार ५२ लोक जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत बेपत्ता झाले आहेत. त्यांचा शोध कोण घेणार? असा सवाल आता विचारला जात आहे.
प्रेमप्रकरण, राग, घरगुती भांडण अशा विविध कारणांमुळे लहान मुलांसह वृद्ध घर सोडतात. याची पोलिस ठाण्यात मिसिंग म्हणून नोंदही होते. परंतु, त्यांचा शोध लागावा, यासाठी फारशी पावले उचलली जात नाहीत. इकडे नातेवाईक अन्नपाणी सोडतात, शोधासाठी पोलिस ठाण्यांचे उंबरठे झिजवतात. पण पोलिस यंत्रणा आणि शासनाला याचे गांभीर्य नसते. मात्र, नेत्यासह उद्योजकाच्या मुलाचे अपहरण झाल्यावर यंत्रणा काय करते, हे माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या प्रकरणावरून समोर आले आहे.
सरकारचे लक्ष आहे का?
चालू वर्षातील १२ फेब्रुवारीपर्यंत राज्यात १८ वर्षांवरील ७ हजार ४८१ तर अल्पवयीन ५७१ लोक बेपत्ता झाले आहेत. त्यांचा शोध लागलेला नाही.
सामान्यांसाठी वेगळा न्याय का?
घरातून एखादी व्यक्ती बेपत्ता झाल्यावर तक्रार देण्यासाठी गेल्यास पोलिस ठाण्यात तासनतास बसवून ठेवले जाते. परंतु, माजी मंत्र्याच्या मुलाचा शोध घेण्यासाठी तातडीने अपहरणाचा गुन्हा दाखल केला. एवढेच नव्हे तर आपले राजकीय वजन वापरून बँकॉकला जाणारे विमान परत पुण्यात बोलावण्यात आले. नेत्यांसाठी एक आणि सामान्यांसाठी वेगळा न्याय का? असा सवाल सरकारला विचारला जात आहे.