गावात चर्चा रंगली नदीतील दगडावर बसलेल्या भुताची, प्रत्यक्षात पाहताच समोर आली धक्कादायक बाब
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 09:03 AM2022-12-26T09:03:40+5:302022-12-26T09:05:44+5:30
Sindhudurg News: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका गावात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वेंगुर्ला तालुक्यातील मोचेमाड या गावामध्ये नदीतील दगडावर भूत बसून असल्याची चर्चा रंगली होती. नेमका हा प्रकार काय आहे, यावरून तर्कवितर्कांना आणि अफवांना उत आला होता.
सिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका गावात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वेंगुर्ला तालुक्यातील मोचेमाड या गावामध्ये नदीतील दगडावर भूत बसून असल्याची चर्चा रंगली होती. नेमका हा प्रकार काय आहे, यावरून तर्कवितर्कांना आणि अफवांना उत आला होता. मात्र काही धाडसी तरुणांनी होडीतून त्या दगडापर्यंत जात खातरजमा केल्यावर धक्कादायक बाब उघडकीस आली.
गावात भूत म्हणून ज्या गोष्टीची चर्चा रंगली होती. ती प्रत्यक्षात एक वृद्ध महिला निघाली. ओहोटीच्या वेळी मनोरुग्ण असलेली ही महिला नदीतील पाणी कमी झाल्यावर खडकावर जाऊन बसली होती. मात्र भरती आल्यानंतर तिला तिथून बाहेर पडता येईना. त्यामुळे जवळपास दोन तीन दिवस ती तिथेच बसून राहिली. सलग तीन दिवस अन्नावाचून राहिल्याने या महिलेची प्रकृती खालावली आहे.
दरम्यान, गावात अफवांना उत आल्यावर काही तरुण होडीद्वारे सदर महिला असलेल्या खडकाजवळ पोहोचले. त्यांनी तीन दिवस अन्नावाचून उपाशी असलेल्या आणि पाण्यात भिजल्याने आणि थंडीमुळे कुडकुडणाऱ्या या महिलेची सुटका केली. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. या महिलेला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच पोलीस तिच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत.