टीईटी घोटाळा; आणखी १,६६३ शिक्षकांचा ‘निकाल’; अधिकाऱ्यांवर कारवाईचे काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2022 06:00 AM2022-10-16T06:00:14+5:302022-10-16T06:00:51+5:30
सायबर पोलिसांनी गुन्हे दाखल केल्यानंतर परिषदेने सर्व उत्तर पत्रिकांची कसून तपासणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई/यवतमाळ : प्राथमिक शिक्षकाची नोकरी मिळविण्यासाठी आवश्यक टीईटी परीक्षेत २०१८ साली झालेल्या गैरप्रकारात सामील १ हजार ६६३ उमेदवारांना आता कधीही शिक्षक होता येणार नाही. त्यांच्यावर कायमस्वरूपी बंदी घालण्याचा आणि त्यांचा निकालही रद्द करण्याचा निर्णय राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केला. परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी ही माहिती दिली.
पुण्याच्या सायबर पोलिसांनी गुन्हे दाखल केल्यानंतर परिषदेने सर्व उत्तर पत्रिकांची कसून तपासणी केली. २०१८ मध्ये आतापर्यंत १ हजार ६६३ उमेदवारांनी गैरप्रकार केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातील ७७९ उमेदवार अपात्र असताना त्यांनी गुणांमध्ये फेरफार करून स्वतःला उत्तीर्ण केले, तर ८८४ उमेदवारांनी आरोपींच्या साहाय्याने बनावट गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र तयार करून घेतले. बोगस टीईटी प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरीत कार्यरत शिक्षकांनाही घरी बसावे लागणार आहे.
अधिकाऱ्यांवर कारवाईचे काय?
घोटाळ्यांच्या पाठीशी असलेल्या अधिकाऱ्यांवरील कारवाईचे काय, अटक झालेल्यांचे पुढे काय झाले, याची माहिती लोकप्रतिनिधींनी द्यावी, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे.
अनुकंपा तत्त्वालाही टीईटी लागू
टीईटीची अट अनुकंपा तत्वावर नोकरी मागणाऱ्यांना लागू नसल्याचा दावा संस्था चालकांकडून केला जात आहे. प्रत्यक्षात ही नियुक्ती देतानाही टीईटी उत्तीर्ण असलाच पाहिजे, असे आदेश ११ ऑक्टोबर रोजी ग्रामविकास खात्याने जिल्हा परिषदांना देताना एनसीईआरटीचा अभिप्राय घेतला होता.
गैरप्रकार केलेले शिक्षक
२०१९ ७,८७४
२०१८ १,६६३
एकूण ९,५३७
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"