ठाकरे सरकारने दिलेली १२ आमदारांसाठीची यादी रद्द करावी; CM शिंदेंची राज्यपालांकडे शिफारस
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2022 07:25 AM2022-09-04T07:25:21+5:302022-09-04T07:25:29+5:30
राज्यपाल लवकरच ती यादी रद्द झाल्याचे पत्र नवीन सरकारला देतील आणि त्यानंतर शिंदे-भाजप सरकारकडून १२ नावांची नव्याने शिफारस केली जाणार आहे.
मुंबई : विधान परिषदेवर राज्यपाल कोट्यातून नियुक्त करावयाच्या १२ आमदारांसाठीचीउद्धव ठाकरे सरकारने पाठविलेली नावांची यादी रद्द करावी, असे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठविले आहे. राज्यपाल लवकरच ती यादी रद्द झाल्याचे पत्र नवीन सरकारला देतील आणि त्यानंतर शिंदे-भाजप सरकारकडून १२ नावांची नव्याने शिफारस केली जाणार आहे.
अशी होती ठाकरे सरकारची यादी -
शिवसेना -
अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर, विजय करंजकर, नितीन बानुगडे पाटील आणि चंद्रकांत रघुवंशी
राष्ट्रवादी -
एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे आणि गायक आनंद शिंदे
काँग्रेस -
रजनीताई पाटील, सचिन सावंत, अनिरुद्ध वनकर, मुझफ्फर हुसेन
सत्तानाट्यानंतर चर्चा सुरू
- राज्यात नाट्यमय घटनाक्रमानंतर सत्तांतर झाले आणि तेव्हापासूनच राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची नावे नव्याने राज्यपालांकडे पाठविली जाणार अशी चर्चा सुरू झाली होती. ठाकरे सरकारने जी यादी पाठविली होती त्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आपले नाव या यादीतून वगळावे, अशी विनंती राज्यपाल कोश्यारी यांना भेटून केली होती.
- काँग्रेसच्या रजनीताई पाटील राज्यसभेवर गेल्या. एकनाथ खडसे विधानसभा सदस्यांमधून विधान परिषदेवर गेले. शिवसेनेच्या यादीतील चंद्रकांत रघुवंशी आता एकनाथ शिंदे गटात आहेत.
शिंदे गटाचा आग्रह चार जागांसाठी
आता नव्याने जी यादी राज्यपालांकडे पाठविली जाईल त्यात भाजप-शिंदे गट अशी विभागणी असेल. भाजपच्या वाट्याला नऊ जागा तर शिंदे गटाला तीन जाण्याची शक्यता आहे.
शिंदे गट मात्र चार जागांसाठी आग्रही असल्याची माहिती आहे. भाजपच्या कोट्यातून विधान परिषदेवर जाण्यासाठी किमान एक हजार जण इच्छुक आहेत. त्यातून कोणाला संधी द्यायची ही भाजप नेतृत्वासाठी डोकेदुखी आहे. त्यामुळे नवे नाट्य रंगलेले पाहायाला मिळणार आहे.