महायुती, महाविकास आघाडीनंतर राज्यात तिसरा पर्याय; 'या' १३ छोट्या पक्षांची आघाडी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 12:52 PM2023-08-05T12:52:54+5:302023-08-05T12:53:36+5:30
महाविकास आघाडीचा वाईट अनुभव आम्हाला आला आहे. आम्ही प्रश्नांसाठी आंदोलन करणारे आणि निवडणूक लढणारे छोटे पक्ष आहोत असं त्यांनी म्हटलं.
मुंबई – गेल्या ४ वर्षात राज्यात बरीच मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली आहे. एकीकडे शिवसेना-भाजपा-काँग्रेस-राष्ट्रवादी या ४ प्रमुख पक्षांमध्ये लढत दिसते तर दुसरीकडे राज्यातील १३ छोटे पक्ष एकत्र येऊन महायुती-महाविकास आघाडीनंतर लोकांना पर्याय तिसरी आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू झालाय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी यासाठी पुढाकार घेतल्याचे पाहायला मिळते.
याबाबत राजू शेट्टी म्हणाले की, ज्या पक्षांना चळवळीची पार्श्वभूमी आहे अशा १३ छोट्या पक्षांनी एकत्र येण्याचे ठरवले आहे. राज्यात सरकार कुणाचेही असो परंतु राज्यातील लोकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही संघर्ष करतो. प्रादेशिक विकास मंच गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहे. यात सहभागी असणाऱ्या पक्षाला चळवळीची पार्श्वभूमी आहे. त्यामाध्यमातून राज्य सरकारच्या धोरणावर अंकुश ठेवण्याचे काम ही आघाडी करतेय. महाविकास आघाडीचा वाईट अनुभव आम्हाला आला आहे. आम्ही प्रश्नांसाठी आंदोलन करणारे आणि निवडणूक लढणारे छोटे पक्ष आहोत असं त्यांनी म्हटलं.
प्रादेशिक विकास मंचाची येत्या काही दिवसांत कोल्हापूरात बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना, स्वराज्य पक्ष, आम आदमी पार्टी, सीपीआय, लाल निशाणी, बहुजन विकास आघाडी, समाजवादी पक्ष, जनता दल, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, बहुजन रिपल्बिलकन सोशलिस्ट पक्ष, भाकपा, माकप, या पक्षांचा हा समुह आहे. राज्यातील छोटे पक्ष मिळून दबाव गट तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. आगामी निवडणुकांबाबत धोरण आखणण्यासाठी लवकरच कोल्हापूरात या पक्षाच्या प्रतिनिधींची बैठक होईल अशी माहिती समोर येत आहे.