वाघ आला रे आला, वस्तीत वाजणार सायरन ! हल्ले रोखण्यासाठी जंगलांबाहेर अदृश्य कुंपण देणार माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 08:06 AM2023-04-18T08:06:51+5:302023-04-18T08:11:53+5:30
Tiger: वाघांच्या हल्ल्यात सहा वर्षांत २५० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. वाघांकडून दिवसाआड एका तरी व्यक्तीवर हल्ला होत असल्याची वन क्षेत्रात राहणाऱ्या गावकऱ्यांची तक्रार आहे.
मुंबई : वाघांच्या हल्ल्यात सहा वर्षांत २५० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. वाघांकडून दिवसाआड एका तरी व्यक्तीवर हल्ला होत असल्याची वन क्षेत्रात राहणाऱ्या गावकऱ्यांची तक्रार आहे. हे रोखण्यासाठी आता आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची मदत घेतली जाणार आहे. वस्तीच्या आसपास वाघ येताच गावकऱ्यांना अलर्ट करण्यासाठी सायरन वाजणार आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाजवळील दोन गावांत अशा प्रकारचे सायरन बसवण्यात येत आहेत.
नुकतीच व्याघ्र गणना जाहीर झाली, त्यात महाराष्ट्रात ४०० च्या आसपास वाघ वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. ही संख्या वाढत असतानाच त्यांचा मानवाशी होणारा संघर्षही वाढीस लागला आहे.
विधिमंडळाच्या अधिवेशनातही याचे पडसाद उमटले होते. सातारा सांगलीपासून विदर्भातील लोकप्रतिनिधींनी वाघ-बिबट्यांच्या हल्ल्यांबद्दल चिंता व्यक्त केली होती. सांगली जिल्ह्यातील वाळवा व शिराळा तालुक्यात गेल्या काही दिवसांत ५०० पेक्षा अधिक गाई-गुरांना बिबट्याने ठार केल्याची आकडेवारी आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सुमारे ८६ वाघ आहेत, चंद्रपूरमध्ये ११७ तर गडचिरोलीत २७ वाघ आहेत.
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेंतर्गत ३७६ कोटी खर्च
चंद्रपूर जिल्ह्यात मानव वाघांच्या वाढत्या संघर्षावर मुख्य वन संरक्षकांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक समिती नेमण्यात आली. त्यात वनांवरील गावकऱ्यांचे अवलंबन कमी करण्यास सुचवण्यात आले. त्याशिवाय डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेंतर्गत गावकऱ्यांना घरगुती गॅस, सौरऊर्जा उपकरणे, सौरऊर्जा कुंपण पुरवण्यासाठी आतापर्यंत ३७६ कोटी ७८ लाख रुपये खर्च करण्यात आले.
अदृष्य कुंपण असे करेल काम
n आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा आधार घेत वाघांच्या आगमनाची सूचना देणारी यंत्रणा लावण्यात येत आहे.
n यासाठी जंगलाबाहेर अदृश्य कुंपण उभारण्यात येणार आहे. त्यामध्ये थर्मल लहरींचा वापर केला जाईल.
n यातून वाघ-बिबट्या जाताच त्यांच्या आगमनाचा इशारा गावकऱ्यांना मिळेल, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.