राज्यातील मुद्रांक कार्यालयांची वेळ दोन तासांनी वाढवली, रात्री सव्वा आठपर्यंत सुरू राहणार कार्यालये
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 19:20 IST2025-02-27T19:20:02+5:302025-02-27T19:20:53+5:30
नव्या आर्थिक वर्षात शासनाचे बदलतात धोरण

संग्रहित छाया
कोल्हापूर : आर्थिक वर्षाच्या अखेरच्या मार्च महिन्यात वाढणारी दस्तसंख्या, सर्व्हर डाऊनची तांत्रिक अडचण लक्षात घेऊन मुद्रांक विभागाने दस्त नोंदणीसाठी कार्यालयाची वेळ दोन तासांनी वाढवली आहे. १ ते ३१ मार्चपर्यंत वेळेत सवलत देण्यात आली असून राेज सकाळी पावणे दहा ते रात्री सव्वा आठ वाजेपर्यंत कार्यालयाची वेळ असेल. मात्र नागरिकांनी सायंकाळी ६ वाजेपर्यंत दस्त सादर करणे आवश्यक आहे.
नव्या आर्थिक वर्षात शासनाचे धोरण बदलतात. दस्त नोंदणी, रेडिरेकनरचा दर कमी जास्त होतो. शिवाय वर्षअखेर असल्याने काही सोयी-सवलती दिल्या जातात. नवीन वर्षात दस्त नोंदणीचे नियम, निकष, दर बदलण्याची शक्यता असल्याने नागरिकांची ३१ मार्च पूर्वी दस्त नोंदणी करण्याची घाई असते.
या काळात खूप जास्त संख्येने दस्त येत असल्याने सर्व्हरला अडचणी येऊन डाऊन होतो. त्यामुळे दस्त नोंदणीची प्रक्रिया हळू होते. या तांत्रिक अडचणींमुळे दस्त नोंदणी थांबू नये ३१ मार्चपूर्वी सर्व नोंदणी पूर्ण व्हावी यासाठी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक कार्यालयाने १ ते ३१ मार्च या कालावधीत राज्यातील सर्व मुद्रांक कार्यालयांची वेळ दोन तासांनी वाढवली.
दिवसाला ५० हून अधिक दस्त
वर्षातील ११ महिन्यात मुद्रांकच्या करवीरसारख्या कार्यालयात दिवसाला ३० ते ३५ दस्त नोंदणी होते. ग्रामीण भागात ही संख्या थोडी कमी असते. पण मार्च महिन्यात विशेषत: १५ मार्चनंतर ही संख्या थेट ५० वर जाते. दिवसाला सरासरी ४५ ते ५० दस्त नोंदणी होते. अशी स्थिती राज्यातील सर्वच मुद्रांक कार्यालयांमध्ये असल्याने सर्व्हरवर लोड येऊन यंत्रणा मंदावते.
८० टक्के उद्दिष्ट पूर्ण..
जिल्हा मुद्रांक विभागाला यावर्षी ६५० काेटींचे उद्दिष्ट आहे. फेब्रुवारीअखेर ८० टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले असून उर्वरित २० टक्के उद्दिष्ट मार्चमध्ये पूर्ण करण्याचे विभागाचे प्रयत्न आहेत.
- सध्याची वेळ : सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५.
- १ ते ३१ मार्च दरम्यानची वेळ : सकाळी ९.४५ ते रात्री ८.१५
- दस्त सादर करण्याची वेळ : सायंकाळी ६ वाजेपर्यंत
नागरिकांच्या सोयीसाठी दस्त नोंदणीची वेळ दोन तासांनी वाढविण्यात आली आहे. नागरिकांनी सायंकाळी ६ वाजेपर्यंत आपले दस्त कार्यालयात सादर करावेत व वेळेच्या सवलतीचा लाभ घ्यावा. - बाबासाहेब वाघमोडे, मुद्रांक जिल्हाधिकारी