शिवरायांचा पुतळा ठेवलेला बुरूजावरील दगड धक्का लावला तरी हलतोय; भास्कर जाधवांची राणे, शिंदेंवर खरमरीत टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 05:08 PM2024-09-02T17:08:14+5:302024-09-02T17:08:50+5:30
राजकोट येथे झालेला राडा हा भाजपच्या संस्कृतीशी सुसंगत असा राडा होता. राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याची पाहणी करण्यासाठी आज जाधव आले होते.
छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचाच नव्हे तर उभ्या जगाचे स्वाभिमान आहेत. त्यांनी केलेल्या राज्य कारभारावर जगाच्या पातळीवर अभ्यास होतो आहे. महाराजांचा पुतळा अशा अवस्थेत पाहताना मनाला प्रचंड वेदना होत आहेत. याठिकाणी असणाऱ्या बुरुजावरील दगड हा नुसता नाममात्र ठेवला आहे त्याला जरा धक्का लागला तरी पडतो आहे. 45 किमी ताशी वेगाने वारा आला म्हणून पुतळा पडला, असे सांगणाऱ्यांना लाजा वाटल्या पाहिजेत, अशी खरमरीत टीका ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी नारायण राणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.
यापूर्वी राम मंदिर, काश्मीरचा प्रश्न निवडणुकीचा एटीएम कार्ड म्हणून वापरण्यात आले आणि आता छ. शिवाजी महाराजांचा पुतळा निवडणुकीसाठी एटीएम कार्ड म्हणून कसं वापरले गेलं त्याचे हे जिवंत उदाहरण आहे. छ. शिवाजी महाराजांचा मतांसाठी उपयोग करुन घेण्याच्या उद्देशाने पुतळा उभारला होता. पुतळ्याचे काम नवख्या लोकांना का दिले ? भ्रष्टाचारासाठी छत्रपतींचे नाव वापरण्याचे काम या ठिकाणी केले आहे, अशा लोकांचा राजकीय क्षितीजावरुन कडेलोट करायला पाहिजे, असे जाधव म्हणाले. राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याची पाहणी करण्यासाठी आज जाधव आले होते.
राजकोट येथे झालेला राडा हा भाजपच्या संस्कृतीशी सुसंगत असा राडा होता. हा राडा भाजपची कार्यपद्धती आणि नित्याचा कार्यक्रम होता. हा राडा करत असताना भाजपचे वरीष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे उपस्थित होते. नारायण राणे यांनी विधानसभेत भाषण करताना सांगितले होते की भाजप हा गुंडांचा, भ्रष्टाचाऱ्यांचा, दरोडेखोरांचा पक्ष आहे, असा आरोप जाधव यांनी केला. तसेच नितेश राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यावर आदिलशहाची पिल्लावळ आजही या मातीत जन्माला आली आहे आणि त्यांच्याकडूनच अशी वक्तव्य होतात, असा टोला लगावला आहे.
या राज्याला देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा कुचकामी, सत्तेचा दुरुपयोग करणारा, पोलिसांचे खच्चीकरण करणारा उपमुख्यमंत्री मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्देव आहे, अशी टीका जाधव यांनी फडणवीसांवर केली आहे.