हात सुटला अन् पार्वतीची जाऊ सरस्वती बुडाली, ट्रॅक्टर विहिरीत कोसळला अन् होत्याचे नव्हते झाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 08:22 IST2025-04-05T08:21:49+5:302025-04-05T08:22:16+5:30

Nanded Tractor Accident:  नांदेड जिल्ह्यातील आलेगाव शिवारातील  भुईमूग निंदनासाठी मजूर घेऊन जाणारा ट्रॅक्टर शुक्रवारी सकाळी विहिरीत पडल्याने सात महिलांचा मृत्यू झाला. तर तिघांना वाचविण्यात प्रशासनाला यश आले आहे.

The tractor fell into the well and what was there was gone, the hand slipped and Parvati's daughter Saraswati drowned... | हात सुटला अन् पार्वतीची जाऊ सरस्वती बुडाली, ट्रॅक्टर विहिरीत कोसळला अन् होत्याचे नव्हते झाले

हात सुटला अन् पार्वतीची जाऊ सरस्वती बुडाली, ट्रॅक्टर विहिरीत कोसळला अन् होत्याचे नव्हते झाले

 नांदेड  - जिल्ह्यातील आलेगाव शिवारातील  भुईमूग निंदनासाठी मजूर घेऊन जाणारा ट्रॅक्टर शुक्रवारी सकाळी विहिरीत पडल्याने सात महिलांचा मृत्यू झाला. तर तिघांना वाचविण्यात प्रशासनाला यश आले आहे.

ट्रॅक्टरच्या हेडची समोरील दोन्ही चाके वर झाली आणि काही कळायच्या आत ट्रॉलीसह मजूर महिला विहिरीत कोसळल्या. प्रत्येकाने आपला जीव वाचविण्यासाठीची धडपड केली. त्यात पार्वती बुरड यांच्या हाती पाइप लागला अन् त्यांनी लगेचच आपली जाऊ सरस्वतीचा धावा करीत तिला आवाज दिला, तिने हातही दिला. पण, तो निसटला अन् सरस्वती बुडून तिचा मृत्यू झाला. या दोन्ही जावांसोबत सासू कांताबाई बुरड दररोज कामाला येत असतात. पण, शुक्रवारी त्यांना वसमतला जायचे असल्याने त्या घरीच थांबल्या. या अपघातापासून त्या बचावल्या असल्या तरी सुनेच्या मृत्यूने त्या पुरत्या खचल्या आहेत. तान्हुल्यासह तीन लेकरं सोडून गेलेल्या सरस्वतीच्या मृत्यूने कांताबाईचे अश्रू थांबत नव्हते.

हे सर्व मजूर वसमत तालुक्यातील गुंजजवळील लहूजीनगर वस्तीवरील रहिवासी होते. वस्तीवर घटनेची माहिती पोहोचताच आक्रोश झाला. लहान मुले आपली आई सुखरुप आहे का? असा प्रश्न विचारत आक्रोश करीत होते.  

बाप कसाबसा वाचला, पण  माय-लेकीला मृत्यूने गाठले 
अपघातग्रस्त ट्रॅक्टरमध्ये सटवाजी जाधव व त्यांच्या पत्नी ताराबाई आणि मुलगी धुरपता होत्या. ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्यानंतर मोटारीचा पाइप आणि दोरीच्या साहाय्याने सटवाजी हे वरआले. मात्र, त्यांच्या पत्नी आणि मुलीचा बुडून मृत्यू झाला.  

तीन लेकुरवाळींच्या मृत्यूने नऊ चिमुकले झाले पाेरके 
आलेगावमधील दुर्घटनेत तीन लेकुरवाळ्या बायकांसह दोन १८ वर्षांच्या मुलींचाही दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे जवळपास ९ चिमुकले पाेरके झाले. यामध्ये दोन ते दहा वर्षांच्या मुला-मुलींचा समावेश आहे. घटनास्थळी आलेल्या चिमुकल्यांचा आक्रोश पाहून अनेकांचे डोळे पाणावले होते.
विहिरीत बुडून मृत झालेल्या ज्योती सरोदे यांना दोन मुले, एक मुलगी आहे. सपना राऊत यांना दोन मुली, एक मुलगा आणि सरस्वती बुरड यांना दोन मुली, एक मुलगा आहे. त्यातील अनेकांना तर काय घडले? हीदेखील समज नाही. 
या अपघातात वाचलेल्यापैकी पुरभाबाई कांबळे यांची मुलगी सीमरण संतोष कांबळे (१८)
हिचा मृत्यू झाला. पुरभाबाईला आपली लेक विहिरीतच असल्याचे समजताच तिने  धाव घेतली. पण, उपस्थितांनी तिला धीर देत एका झाडाखाली सावलीला नेले. 

Web Title: The tractor fell into the well and what was there was gone, the hand slipped and Parvati's daughter Saraswati drowned...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.