राज ठाकरेंच्या राजकीय कारकिर्दीची शोकांतिका सुरु, ते लोकांच्या विस्मृतीत; भास्कर जाधवांची जहरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 06:33 PM2024-04-15T18:33:14+5:302024-04-15T18:34:08+5:30
Bhaskar Jadhav on Raj Thackeray: एकाचवेळी महायुतीचा प्रचार आणि नंतर काही महिन्यांनी विधानसभेला मनसेचा प्रचार अशा दुविधेत मनसेचे कार्यकर्ते सापडले आहेत. यातून काहींनी राजीनामेही दिले आहेत. यावर उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांनी टीका केली आहे.
राज ठाकरेंनी पाडवा मेळाव्यामध्ये महायुतीला पाठिंबा जाहीर केल्याने मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये राजकीय गणिते बदलण्याची शक्यता आहे. परंतु याचबरोबर राज यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना विधानसभेच्या तयारीला लागा असे आदेश दिले आहेत. एकाचवेळी महायुतीचा प्रचार आणि नंतर काही महिन्यांनी विधानसभेला मनसेचा प्रचार अशा दुविधेत मनसेचे कार्यकर्ते सापडले आहेत. यातून काहींनी राजीनामेही दिले आहेत. यावर उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांनी टीका केली आहे.
राज ठाकरेंच्या राजकीय कारकिर्दीची शोकांतिका सुरु आहे. राज ठाकरेंसारखा नेता महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरून विस्मृतीत गेलासारखा आहे. चांगला नेता महाराष्ट्राच्या राजकारणातून बाद होणे हे वाईट आहे. भाजपला लहान मोठे पक्ष संपवायचे आहेत. त्याची सुरवात शिंदे, अजित पवारांपासून झाली. तोच प्रयत्न उद्धव ठाकरेंबाबत केला गेला, असा आरोप जाधव यांनी केला आहे.
नरेंद्र मोदी आणी महाराष्ट्र सरकारच्या जाहिरातीचा खर्च कुठून होतो? सर्वसामान्य जनतेच्या पैशातून जाहिरातीचा खर्च करायचा आणि जाहिराती मात्र आपल्या आणि पक्षाच्या करायच्या. अधिवेशनात बजेटमध्ये 1000 कोटींचे बजेट मांडले. मोदींच्या जाहिरातींचा मुद्दा जनतेच्या लक्षात आला आहे. इलेक्टोरल बॉण्डमध्ये 16000 कोटींचा भ्रष्टाचार समोर आला आहे. सुप्रीम कोर्टाच्या धाडसामुळे हा भ्रष्टाचार बाहेर आला आहे. भ्रष्टाचाराच्या पैशातून होणाऱ्या जाहिराती करणाऱ्या लोकांना घरी पाठवा, असे जाधव म्हणाले.