विद्युत सहाय्यकांच्या कागदपत्रांची पडताळणी २९ व ३० ऑक्टोबर रोजी महावितरणच्या परिमंडल कार्यालयात होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2022 02:32 PM2022-10-27T14:32:18+5:302022-10-27T14:33:48+5:30
नव्याने निवड झालेल्या उमेवारांची तसेच प्रतिक्षा यादीवरील उमेदवारांची परिमंडलनिहाय यादी महावितरणच्या संकेतस्थळावर (www.mahadiscom.in) उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मुंबई : उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्णयानुसार प्रसिध्द केलेल्या सुधारित निवड यादीमध्ये नव्याने निवड झालेल्या विद्युत सहाय्यक या संवर्गातील उमेदवारांची तसेच प्रतिक्षा यादीवरील उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी परिमंडलनिहाय २९ व ३० ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे.
महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक या संवर्गाची रिक्त पदे भरण्याकरिता ३ वर्षांच्या निश्चित कालावधीकरिता कंत्राटी पध्दतीने उमेदवारांची निवड करण्यासाठी एप्रिल व जुलै २०१९ मध्ये विद्युत सहाय्यक या पदांच्या भरतीबाबत जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती.
परिमंडलनिहाय यादीमधील उमेदवारांनी त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या परिमंडल कार्यालयांमध्ये २९ व ३० ऑक्टोबर २०२२ रोजी आपल्या कागदपत्रांची पडताळणी स्वतः उपस्थित राहून करणे अनिवार्य आहे. नव्याने निवड झालेल्या उमेवारांची तसेच प्रतिक्षा यादीवरील उमेदवारांची परिमंडलनिहाय यादी महावितरणच्या संकेतस्थळावर (www.mahadiscom.in) उपलब्ध करून देण्यात आली आहे. जे उमेदवार कागदपत्रे पडताळणीकरिता हजर राहणार नाहीत, अशा उमेदवारांची उमेदवारी रद्द समजली जाईल.