कुलगुरूंची समिती ठरवणार ई-अभ्यास मंडळांचा मार्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 12:07 PM2023-08-31T12:07:08+5:302023-08-31T12:07:17+5:30
राज्यामध्ये एकसमान अभ्यासक्रम आराखडा तयार होण्याच्या तसेच विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रमांची देवाण-घेवाण होण्याच्या दृष्टीने समिती काम करेल.
मुंबई : राज्यातील विद्यापीठांमधील अभ्यासक्रम व श्रेयांक आराखडा एकसमान राहण्याच्या दृष्टीने विद्यापीठांमध्ये समन्वय साधण्यासाठी आणि प्रस्तावित ई - अभ्यास मंडळ मंचांना मार्गदर्शन करण्यासाठी कुलगुरूंची समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - २०२०ची राज्यात अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने या धोरणाचा अभ्यास करून राज्य शासनास अहवाल सादर करण्यासाठी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदचे माजी महासंचालक डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यबल गट स्थापन करण्यात आला होता.
या कार्यबल गटाने अहवाल शासनास सादर केला आहे. सर्व विद्यापीठांच्या संबंधित विषयाच्या अभ्यासमंडळाच्या अध्यक्षांचे प्रतिनिधीत्व असलेला ई - अभ्यासमंडळ मंच स्थापन केला जाईल, अशी शिफारस होती.
...अशी असेल समितीची कार्यकक्षा
राज्यामध्ये एकसमान अभ्यासक्रम आराखडा तयार होण्याच्या तसेच विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रमांची देवाण-घेवाण होण्याच्या दृष्टीने समिती काम करेल. समन्वय समिती ई- अभ्यासमंडळ मंचामधील सदस्य संख्या व प्रतिनिधीत्त्वाच्या अनुषंगाने शासनास शिफारस करेल.
समन्वय समिती ई-अभ्यासमंडळ मंचाच्या प्रभावी कामकाजासाठी आराखडा तयार करेल व त्याच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन करेल. त्याचप्रमाणे, ई - अभ्यासमंडळ मंचाचे सनियंत्रणही करेल.
सर्व ई - अभ्यासमंडळ मंचाच्या वार्षिक अहवालाचा कार्यकारी सारांश समन्वय समितीद्वारे संकलित केला जाईल आणि कुलगुरूंच्या संयुक्त बैठकीत सादर केला जाईल. समन्वय समितीचा कालावधी हा प्रथम टप्प्यात दोन वर्षांसाठी असेल.