पुण्याच्या विकासाची दूरदृष्टी असलेला नेता हरपला; गिरीश बापटांच्या निधनानं अश्रू अनावर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 12:57 PM2023-03-29T12:57:48+5:302023-03-29T13:16:47+5:30
१९९५ मध्ये गिरीश बापट पहिल्यांदा भाजपाचे आमदार झाले. २०१९ मध्ये गिरीश बापट हे लोकसभेत निवडून गेले.
पुणे - शहराचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले असून पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. गेल्या काही दिवसांपासून गिरीश बापट यांची प्रकृती खालावली होती. सलग ५ वेळा ते कसबा विधानसभेचे आमदार म्हणून निवडून आले होते. सर्वपक्षांसोबत गिरीश बापट यांचे उत्तम संबंध होते. गिरीश बापट यांच्या निधनानं महाराष्ट्रात राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
३ सप्टेंबर १९५० रोजी पुण्यातील तळेगाव दाभाडे येथे गिरीश बापटांचा जन्म झाला. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. १९७३ मध्ये बापटांनी टेल्कोमध्ये नोकरी केली. कामगार संघटनेच्या माध्यमातून ते सक्रीय राजकारणात उतरले. १९८३ मध्ये गिरीश बापट पहिल्यांदा नगरसेवक म्हणून पुणे महापालिकेत निवडून आले. त्यानंतर सलग ३ वेळा ते नगरसेवक होते. १९९३ च्या विधानसभा पोटनिवडणुकीत गिरीश बापटांचा कसबा विधानसभेत पराभव झाला. १९९५ मध्ये गिरीश बापट पहिल्यांदा भाजपाचे आमदार झाले. २०१९ मध्ये गिरीश बापट हे लोकसभेत निवडून गेले.
बापटांच्या निधनानं अनेक जण भावूक
महानगरपालिका, विधानसभा, राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी केलेले काम, पुण्यातील विकासाचे योगदान कधीही विसरू शकत नाही. गिरीश बापट यांच्या निधनानं मोठी पोकळी निर्माण झाली आहे - अंकुश काकडे, राष्ट्रवादी प्रवक्ते
राजकारणात आल्यानंतर त्यांच्यासोबत काम करताना खूप अनुभव आला. सामान्य माणसांकडे पाहण्याचा दृष्टीकोन त्यांनी अनेकांना दिला. सगळ्या आमदारांची नियमित बैठका, त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्याची त्यांची सातत्याची भूमिका होती. ते सर्वपक्षीय मित्र होते. वेगवेगळ्या पक्षांशी वाटाघाटी करून अनेक निवडणुका लढवल्या. बापट यांचं जाणं पक्षासाठी मोठे नुकसान आहे. कुठल्याही स्तरातील कार्यकर्त्यांसोबत व्यक्तीसोबत मैत्री जोडणे आणि त्यांची चूक सहजपणे जाणवून द्यायचे ही त्यांची खुबी होती त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. - विनोद तावडे, भाजपा राष्ट्रीय नेते
गेल्या ४० वर्षापासून आम्ही गिरीश बापटांसोबत काम करतोय. मंत्री, खासदार असले तरी आयुष्यभर कार्यकर्ता म्हणून राहिले. विविध पदे भूषवले, पुणे शहराच्या विकासाची दृष्टी असलेला नेता होता. सातत्याने शहराच्या विकासासाठी काम करत होतो. सार्वजनिकदृष्ट्या महाराष्ट्रात राजकीय नेत्यांनी कसे वागले पाहिजे याची शिकवण देणारी पोकळी गिरीश बापटांच्या जाण्यानं उभी राहिली आहे. - मोहन जोशी, नेते काँग्रेस