मतदारांनी एक्झिट पोल फोल ठरवले, देशाचे अन् राज्यातीलही अंदाज चुकले; सट्टाबाजार मालामाल
By उद्धव गोडसे | Published: June 4, 2024 07:25 PM2024-06-04T19:25:03+5:302024-06-04T19:25:03+5:30
निकालात उलथापालथ
कोल्हापूर : निवडणूकपूर्व आणि मतदानानंतर विविध संस्थानी जाहीर केलेले एक्झिट पोल मतदारांनी फोल ठरवले. जवळपास सर्वच संस्थांनी भाजप स्वबळावर बहुमत मिळवून महायुती ३५० ते ४०० जागा जिंकेल असे अंदाज वर्तवले होते. राज्यात महायुतीच्या जागा काहीशा कमी झाल्या तरी २५ ते ३० जागा जिंकतील असा अंदाज होता. पण, राज्यात इंडिया आघाडीने मुसंडी मारून एक्झिट पोल खोटे ठरवले. अनेक ठिकाणी निकालात उलथापालथ झाल्यामुळे सट्टेबाजार मात्र मालामाल झाला.
मतदानाचा सातवा टप्पा पूर्ण होताच देशभरातील विविध संस्थांनी त्यांचे एक्झिट पोल जाहीर केले. बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजप स्वबळावर सत्ता मिळवण्याचा दावा केला जात होता. तर देशभरात महायुती ३५० ते ४०० जागा जिंकेल असे चित्र दाखवले जात होते. इंडिया आघाडीला कुणीच फारसे जमेत धरले नाही. केवळ १२४ ते १६० जागा इंडिया आघाडीच्या पारड्यात जातील असा अंदाज बांधला होता. टीव्ही९-पोलस्ट्रॅट वगळता अन्य संस्थांनी राज्यात महायुतीला पसंती दिली होती. एकमेव टीव्ही९-पोलस्ट्रॅटने महायुतीपेक्षा इंडिया आघाडी जास्त जागा जिंकेल असे भाकीत केले होते. राज्यात एक्झिट पोल सपशेल फेल ठरले.
या निकालाने सट्टा बाजारात मात्र मोठी उलाढाल केली. भाजपला एकहाती बहुमत मिळवता आले नाही. उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रात भाजपची कमालीची पिछेहाट झाली. अनेक ठिकाणी अनपेक्षित निकाल लागले. यामुळे सट्टा बाजारात बुकी मालामाल झाले. सट्टा बाजारात फेव्हरेट ठरलेले काही उमेदवारही पराभूत झाल्याचे दिसत आहे. हातकणंगले लोकसभा मतदार संघात याची प्रचिती आली.
असा होता अंदाज
संस्था - एनडीए - इंडिया - इतर
इंडिया टुडे-एक्सिस - ३६१ ते ४०१ - १३१ ते १६६ - ८ ते २०
एबीपी-सी व्होटर - ३५३ ते ३८३ - १५२ ते १८२ - ४ ते १२
टीव्ही९ पोलस्ट्रॅट - ३४२ - १६६ - ३५
इंडिया टीव्ही-सीएनएक्स - ३७१ ते ४०१ - १०९ ते १३९ - २८ ते ३८
एनडीटीव्ही-जन की बात - ३६२ ते ३९२ - १४१ ते १६१ - १० ते २०
इंडिया न्यूज-डी डायनामिक्स - ३७१ - १२५ - ४७
रिपब्लिक टीव्ही - ३५९ - १५४ - ३०
न्यूज २४-चाणक्य - ४०० - १०७ - ३६
घडले असे
एनडीए - २९५
इंडिया - २३०
इतर - १८
राज्यातही उलटफेर
बहुतांश संस्थांनी राज्यात महायुतीला फेव्हरेट ठरवले होते. भाजप १७ ते २२ जागा जिंकेल, तर काँग्रेसला केवळ ३ ते ८ जागा जिंकता येतील असा अंदाज संस्थांनी वर्तवला होता. प्रत्यक्षात मात्र काँग्रेसने १३ जागा जिंकत सर्वांचेच अंदाज चुकीचे ठरवले. भाजपला ११ जागांवर समाधान मानावे लागले. ठाकरे गटानेही १० जागा जिंकून मुसंडी मारत एक्झिट पोल फोल ठरवले.