पायातले घुंगरू विसरून शिक्षणाचा धरला मार्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 11:50 AM2023-04-20T11:50:10+5:302023-04-20T11:50:52+5:30
Education: डिजिटलच्या जमान्यामध्ये लोककलेला बगल देत लोककलावंत मंगला बनसोडे यांच्या नातीने शिक्षणाचा मार्ग धरला. त्यातील एक नात एम.डी.पर्यंत शिक्षण घेऊन डॉक्टर झाली आहे, तर दुसरी पदवीचे शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे.
करकंब (सोलापूर) : डिजिटलच्या जमान्यामध्ये लोककलेला बगल देत लोककलावंत मंगला बनसोडे यांच्या नातीने शिक्षणाचा मार्ग धरला. त्यातील एक नात एम.डी.पर्यंत शिक्षण घेऊन डॉक्टर झाली आहे, तर दुसरी पदवीचे शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे.
भाऊ बापू मांग नारायणगावकर ते लोकनाट्य तमाशा मंडळाच्या राज्याच्या अध्यक्ष असलेल्या मंगला बनसोडे यांचे पुत्र नितीन बनसोडे अशी पाचवी पिढी तमाशा क्षेत्रात काम करत आहे. पण, आताची पिढी वेगळा विचार करत आहे. हा पेशा वाईट नसला तरी आम्हाला वेगळं काहीतरी करायचं आहे. या विचाराने त्यांनी शिक्षण मार्गक्रमण केले. दोघींव्यक्तिरिक्त आणखी एक नात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहेत, तर एक फॅशन डिझायनर म्हणून काम करत आहे.
...म्हणून बदलताहेत ध्येय अन् क्षेत्र
मंगला बनसोडे यांच्या कुटुंबातील एका सुनेने सरपंचपद भूषविले होते. नवी पिढी या क्षेत्राला नाव ठेवत नसली तरी यापूर्वीच्या पाच पिढीने हेच काम केले आहे. त्यामुळे आता वेगळं काही तरी करण्यासाठी तसेच समाजसेवा करण्याच्या इच्छेने क्षेत्र बदलत असल्याचे मत लोककलावंत मंगला बनसोडे यांनी व्यक्त केले.
पुणे येथे शिक्षण तर मुंबईत प्रॅक्टिस
एम.डी.पर्यंत शिक्षण घेतलेल्या माधुरी खैरमोडे या लग्नानंतर आता मुंबई येथे प्रॅक्टिस करत आहेत. त्यांचे पतीदेखील डॉक्टर आहेत. दुसरी नात दीक्षा बनसोडे यांनी कऱ्हाड येथे पदवीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर त्या आता पुणे येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत.