विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दोन आठवड्यांचे; सीमाप्रश्नी मुख्यमंत्री ठराव मांडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 06:28 AM2022-12-14T06:28:57+5:302022-12-14T06:29:55+5:30
१९ डिसेंबरपासून अधिवेशन; २१ विधेयके मांडणार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न पेटलेला असताना राज्य विधिमंडळाच्या १९ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सीमाप्रश्नी एक ठराव मांडणार आहेत. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत याबाबत मंगळवारी निर्णय झाला. अधिवेशन दोन आठवडे म्हणजे ३० डिसेंबरपर्यंत चालेल.
अधिवेशन ३० डिसेंबरपर्यंत चालविण्याचे तूर्त ठरले असले तरी सध्या २८ डिसेंबरपर्यंतचे कामकाज निश्चित करण्यात आले आहे. कामकाज सल्लागार समितीची नागपुरात २८ ला पुन्हा बैठक होऊन पुढील कार्यक्रम निश्चित केला जाईल.
महाराष्ट्राच्या अखंडतेबाबत आणि सीमावासीय मराठी भाषकांच्या पाठीशी महाराष्ट्र भक्कमपणे उभा असल्यासंबंधीचा ठराव मुख्यमंत्री शिंदे अधिवेशनात मांडणार आहेत, तसेच मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम राबविण्याबाबत चर्चा झाली. अधिवेशनात अंदाजे २१ विधेयके सभागृहात मंजुरीसाठी मांडली जाणार आहेत. विधान भवनात विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली बैठका झाल्या.
अधिवेशन किमान तीन आठवडे घ्या : अजित पवार
nकोरोनामुळे दोन वर्षे नागपूरला हिवाळी अधिवेशन होऊ शकले नाही. त्यामुळे नागपूर, विदर्भाच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी नागपूरचे हिवाळी अधिवेशन किमान तीन आठवडे घेण्यात यावे, अशी मागणी अजित पवार यांनी आजच्या बैठकीत केली.
nविधिमंडळ सदस्यांना सभागृहाच्या कामकाजात अधिकाधिक भाग घेता यावा, यासाठी सभागृहाचे कामकाज सकाळी साडेनऊपासून सुरू व्हावे, आदी मागण्या पवार यांनी केल्या.