तिसऱ्यांदा पाळणा हलला, महिला अधिकाऱ्याला सरकारी नोकरीवरून तातडीने काढले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 05:00 PM2022-06-01T17:00:13+5:302022-06-01T17:00:35+5:30
शासकीय सेवेत गट अ, ब, क, ड संवर्गाच्या पदाच्या सेवा प्रवेशासाठी २८ मार्च २००५ रोजी राज्यपालांनी लहान कुटुंबाच्या प्रतिज्ञापत्राची अधिसूचना जारी केली.
सातारा : राज्य शासनाने लहान कुटुंब नियम २००५ कायदा २८ मार्च २००५ ला संपूर्ण राज्यात लागू केला. सरकारी नोकरीत असलेल्यांना तिसरे अपत्य असल्यास किंवा झाल्यास त्यांची नोकरी धोक्यात येते. आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये तिसरे अपत्य झाल्याने एका महिला अधिकाऱ्याला नोकरी गमवावी लागली आहे, तर दुसरीकडे पतीच्या निधनानंतर तिसरे अपत्य असतानाही मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर एका महिलेला नोकरीही मिळाली असल्याचे पुढे आले आहे.
शासकीय नोकरदारांनी नोकरी लागण्यापूर्वी दोन अपत्ये असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करायचे असते. जर यामध्ये कोणी खोटी माहिती दिली, तर संबंधितावर गुन्हा दाखल होऊन त्याला नाेकरीवरूनही काढून टाकले जाते. तसेच नोकरीत असताना सुद्धा तिसरे अपत्य झाले, तर त्याचीही नोकरी धोक्यात असते. सध्या सातारा जिल्ह्यामध्ये कारागृहातील एका महिला अधिकाऱ्याला तिसऱ्या अपत्यामुळे नोकरी गमवावी लागली आहे.
कायदा काय सांगतो...
शासकीय सेवेत गट अ, ब, क, ड संवर्गाच्या पदाच्या सेवा प्रवेशासाठी २८ मार्च २००५ रोजी राज्यपालांनी लहान कुटुंबाच्या प्रतिज्ञापत्राची अधिसूचना जारी केली. या अधिसूचनेनुसार राज्य शासनाच्या नियंत्रणाखालील नागरी किंवा इतर कोणत्याही सेवेत असलेल्या कर्मचाऱ्याने २००६ नंतर तिसरे अपत्य जन्माला घातल्यास संबंधिताची सेवा समाप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कृषी खात्याकडे एकही तक्रार नाही
कृषी खात्याकडे यासंदर्भात एकही तक्रार नसल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक विजयकुमार राऊत यांनी सांगितले. कार्यालयातील प्रत्येकाकडून दरवर्षी चाैकशी करून अहवाल मागितला जातो.
तिच्या नोकरीचा अपवादात्मक निर्णय
जिल्हा पोलीस दलामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यांना तीन अपत्ये होती. मात्र, त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाची जबाबदारी पत्नीवर होती. तीन मुलांचे शिक्षण, त्यांचे संगोपन कसे करायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा होता. सरतेशेवटी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीने मुख्यमंत्र्यांकडे आपली व्यथा मांडली. त्यावेळी विशेष केस म्हणून संबंधित महिलेला पतीच्या जागेवर नोकरीत सामावून घेण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, हा अपवादात्मक निर्णय असून, अशाप्रकारे सध्या तरी कोणालाही नोकरीत पुन्हा सामावून घेतले नसल्याचे समोर आले आहे.
तक्रार कोठे व कशी करायची...
ज्या त्या विभागातील वरिष्ठांकडे लेखी तक्रार तुम्ही करू शकता. तुमच्या तक्रारीवरून त्याची शहानिशा केली जाते. त्यानंतर ही तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवून संबंधितावर कारवाई केली जाते.
एका शिक्षकाच्या विराेधात होती तक्रार
काही वर्षांपूर्वी एका शिक्षकाविरोधात तिसऱ्या अपत्याबाबत तक्रार करण्यात आली होती. मात्र, या तक्रारीचे पुढे काय झाले, हे कोणालाच सांगता येईना. सध्या तरी शिक्षण विभागात यासंदर्भात एकही तक्रार नसल्याचे पुढे आले आहे.