मंदिरांचे काम खोळंबले! नऊपैकी ५ मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी २ वर्षांपासून फक्त सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 05:55 AM2024-03-26T05:55:57+5:302024-03-26T06:53:10+5:30
कोपेश्वर मंदिर, गोदेश्वर मंदिर, आनंदेश्वर, मार्कंडेश्वर मंदिर ही मंदिरे पुरातत्त्व विभागाच्या (एएसआय) अखत्यारीत मोडतात.
- अमर शैला
मुंबई : राज्यातील नऊ प्राचीन मंदिरे आणि लेणी-शिल्पे यांचे संवर्धन करून त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याचे काम राज्य सरकारने दोन वर्षांपासून हाती घेतले. मात्र, त्यातील कार्ला येथील एकवीरा देवीसह पाच मंदिरांच्या जीर्णोद्धाराच्या कामात भारतीय पुरातत्त्व विभागाने सातत्याने खोडा घातल्याने ते काम कधी मार्गी लागेल, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कार्ले येथील एकवीरा मातेचे मंदिर, रत्नागिरीतील धूतपापेश्वर मंदिर, कोल्हापूरमधील खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर, नाशिक सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर, छत्रपती संभाजीनगरचे खंडोबा मंदिर, बीडचे पुरुषोत्तमपुरी येथील भगवान पुरुषोत्तम मंदिर, अमरावतीतील लासूर येथील आनंदेश्वर मंदिर, गडचिरोलीतील मार्कंडेश्वर मंदिर, साताराचे उत्तेश्वर मंदिर यांचे या प्रकल्पांतर्गत संवर्धन करण्यात येणार होते. मात्र, केवळ चार मंदिरांच्या जीर्णोद्धाराची कामे सुरू झाली. हे काम सरकारने २०२१ मध्ये हाती घेतले. त्याची जबाबदारी एमएसआरडीसीवर देण्यात आली.
कोपेश्वर मंदिर, गोदेश्वर मंदिर, आनंदेश्वर, मार्कंडेश्वर मंदिर ही मंदिरे पुरातत्त्व विभागाच्या (एएसआय) अखत्यारीत मोडतात. तर एकवीरा माता मंदिर परिसरात लेणी असल्याने जीर्णोद्धारासाठी एएसआयची परवानगी आवश्यक आहे. मात्र, त्यांनी दोन वर्षांत त्यासाठी परवानगी तर दिली नाहीच; उलट एएसआयकडून वारंवार बदल सुचविले जात आहेत.
उत्तेश्वर मंदिर, विकासासाठी निविदा
साताऱ्यातील उत्तेश्वर मंदिर वन विभागाच्या जागेत आहे. त्याच्या संवर्धनासाठी अद्याप वन खात्याची परवानगी मिळालेली नाही. सुविधा उभारण्यासाठी वन खात्याच्या परवानगीची गरज नाही. भक्त निवास, भोजनालय आदींची कामे सुरू केली आहेत. महाबळेश्वर येथून मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची कामेही सुरू आहेत.
‘येथे’ जीर्णोद्धार सुरू
रत्नागिरी येथील धूतपापेश्वर मंदिर, छत्रपती संभाजीनगर येथील खंडोबा मंदिर, बीडमधील भगवान पुरुषोत्तम मंदिर तसेच साताऱ्याच्या उत्तेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराची पहिल्या टप्प्यातील कामे सुरू केली आहेत.