नाट्यसंमेलनाचे पडघम
By Admin | Published: October 29, 2016 03:04 AM2016-10-29T03:04:19+5:302016-10-29T03:04:19+5:30
नाट्यसृष्टीचा वार्षिक मेळा म्हणून ओळख असलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे पडघम आता वाजू लागले आहेत. २०१७च्या सुरुवातीला होऊ घातलेले अखिल भारतीय
- राज चिंचणकर, मुंबई
नाट्यसृष्टीचा वार्षिक मेळा म्हणून ओळख असलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे पडघम आता वाजू लागले आहेत. २०१७च्या सुरुवातीला होऊ घातलेले अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे ९७ वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन उस्मानाबाद वा नागपूर येथे होणार असल्याची चर्चा नाट्यवर्तुळात सुरू आहे.
यंदा ठाणे मुक्कामी पार पडलेल्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनानंतर, पुढचे नाट्यसंमेलन कुठे होणार याविषयी उत्सुकता होती. मधल्या काळात नाट्य परिषदेकडे ९७ वे नाट्यसंमेलन भरवण्यासाठी नाट्य परिषदेच्या उस्मानाबाद, नागपूर व जळगाव या शाखांकडून निमंत्रणे आली. त्यातून उस्मानाबाद आणि नागपूर यापैकी एका ठिकाणी नाट्यसंमेलन आयोजित करण्याबाबत नाट्य परिषदेचा विचारविनिमय सुरू आहे. तरीही यातून नाट्यसंमेलन भरवण्यासाठी उस्मानाबादचे नाव आघाडीवर असल्याचे समजते. त्यामुळे ९७ व्या नाट्यसंमेलनाची माळ उस्मानाबादच्या गळ्यात पडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, याबाबत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर यांच्याशी संपर्क साधला असता, नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होणाऱ्या नाट्य परिषदेच्या बैठकीत ९७ व्या नाट्यसंमेलनाचे ठिकाण निश्चित होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नाट्यसंमेलनाध्यक्षांची निवड...
९७ व्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेला नाट्य परिषदेने प्रारंभ केला असून, या प्रक्रियेच्या अंतर्गत नाट्य परिषदेने सभासदांकडून नावे मागवली आहेत. इच्छुक सदस्यांनी त्यांचे सूचनापत्र, सूचित व्यक्तीच्या लेखी संमतीसह; तसेच सूचक व अनुमोदक यांच्या स्वाक्षरीसह नाट्य परिषदेच्या माहीम, मुंबई येथील यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलात असलेल्या मध्यवर्ती कार्यालयात ५ नोव्हेंबरपर्यंत पाठवण्याचे आवाहन नाट्य परिषदेने केले आहे.