‘रंगमंच’ नाट्य संस्थेवर पडदा पडणार
By admin | Published: June 13, 2016 02:38 AM2016-06-13T02:38:13+5:302016-06-13T02:38:13+5:30
मराठी नाट्यसृष्टीतल्या काही नाट्यसंस्था प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचल्या
राज चिंचणकर,
मुंबई- मराठी नाट्यसृष्टीतल्या काही नाट्यसंस्था प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचल्या, तर ज्या संस्थांच्या भाळी हे भाग्य आले नाही अशा काही संस्था मात्र विंगेत चाचपडत राहिल्या. यात स्वत:चा खिसा हलका करून रंगभूमीवर इमानेइतबारे निव्वळ घाम गाळलेल्या काही रंगकर्मींच्या पदरीही सुख पडले नाही. पण त्यांनी रंगभूमीची सेवा मात्र निष्ठेने केली आणि आजही करीत आहेत. पण या क्षेत्रात भवितव्य घडवणारा त्यांचा हा मार्ग आता अंधकारमय झाला आहे. अशाच एका काळोखी मार्गावर ज्येष्ठ रंगकर्मी उपेंद्र दाते यांची ‘रंगमंच (मुंबई)’ ही नाट्य संस्था आता वाट चालू लागली आहे. मराठी रंगभूमीवरची नाटके एकीकडे बाळसे धरू लागली असताना, या संस्थेला मात्र कुलूप लावण्याची वेळ आली आहे.
मुंबईस्थित ‘रंगमंच’ या संस्थेने गेल्या ४४ वर्षांत तब्बल २५ गाजलेल्या नाटकांचे संपूर्ण महाराष्ट्रात शेकडो प्रयोग सादर केले. सध्या ‘नटसम्राट’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘समज गैरसमज’ अशा नाटकांचे प्रयोग ही संस्था रंगभूमीवर करीत आहे. पण या संस्थेच्या बाबतीतली ही शेवटची धुगधुगी म्हणता येईल. कारण या नाट्य संस्थेची आता अखेरची घंटा रंगमंचावरच्या विंगेत खणखणली आहे. या संस्थेचे सर्वेसर्वा उपेंद्र दाते यांनी ही संस्था बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
नाटक, चित्रपट व मालिकांमध्ये उपेंद्र दाते यांनी विविध भूमिका साकारल्या असल्या, तरी त्यांनी रंगभूमीलाच सर्वार्थाने वाहून घेतले आहे. रंगभूमीची अखंड सेवा करता यावी म्हणून त्यांनी ‘रंगमंच’ ही संस्था सुरू केली; परंतु अलीकडच्या काळात संस्था चालवण्यासाठी कर्ज आणि उसनवारीचा मार्ग त्यांना अवलंबावा लागला. रंगभूमीवर कितीही प्रेम असले तरी मर्यादित आर्थिक ताकद असलेल्या निर्मात्याला नाट्यसृष्टीत तग धरणे अवघड होऊन बसले आहे आणि त्याचा थेट फटका ‘रंगमंच’ला बसला आहे. याचा परिणाम म्हणजे या संस्थेची आता भैरवी आळवण्याकडे वाटचाल सुरू झाली आहे.
>कर्जफेड करून कायमचे थांबणार
कोणत्याही प्रकारचे बीज भांडवल नसतानाही मराठी नाट्यरसिक, सहकलाकार, तंत्रज्ञ व मित्रांच्या साथीने संस्थेने ४४ वर्षे वाटचाल केली. पण आज नाट्यसंहितेपेक्षा नाटकात कोण वलयांकित कलाकार आहेत, याला अधिक महत्त्व आले आहे, असे वाटते. संस्था बंद करायला मन राजी नसले, तरी हा कटू निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे. मात्र सर्व कर्जफेड करून कायमचे थांबण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.
- उपेंद्र दाते, निर्माते, अभिनेते