थिएटरही पूर्ण क्षमतेने सुरू करता येतील
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 07:12 AM2021-10-23T07:12:35+5:302021-10-23T07:12:52+5:30
मराठी नाट्य परिषदेतर्फे बालगंधर्व रंगमंदिरात पवार यांच्या हस्ते ‘तिसरी घंटा’ वाजवून नाट्यगृहाची नांदी झाली.
पुणे : नाट्यगृह आणि चित्रपटगृह कधी सुरू करणार, असे कलाकार सतत विचारायचे. ती आता सुरू झाली. परिस्थिती सुधारली तर दिवाळीनंतर नाट्यगृहे व चित्रपटगृहे पूर्ण क्षमतेने सुरू करता येतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
मराठी नाट्य परिषदेतर्फे बालगंधर्व रंगमंदिरात पवार यांच्या हस्ते ‘तिसरी घंटा’ वाजवून नाट्यगृहाची नांदी झाली. प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेत्री पूजा पवार, मेघराज राजेभोसले यावेळी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधितांशी चर्चा केली. एक पडदा चित्रपटगृहांचेही काही प्रश्न आहेत. त्यातही मी लक्ष घातलेले आहे. मुख्यमंत्र्यांनीही त्यातून मार्ग काढून देऊ, असे त्यांना सांगितले आहे. आपली नाटकांची जी परंपरा आहे, ती यापुढेही आपण कायम ठेवू.
बॉलिवूड मुंबईमध्येच राहील : अजित पवार
बॉलिवूड म्हणजेच हिंदी चित्रपटसृष्टी आपापल्या राज्यात नेण्याचे प्रयत्न काही मुख्यमंत्र्यांनी केले. प्रत्येक राज्याला ते अधिकार आहेत. मात्र, बॉलिवूड मुंबईत १०० वर्षे आहे. राज्य सरकार यापुढे बॉलिवूडला इतक्या चांगल्या सुविधा देईल की ते मुंबई वा महाराष्ट्राबाहेर कुठेच जाणार नाही, असे अजित पवार म्हणाले.