मोहमयी अदाकारीची रंगमयी ‘संगीतबारी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 06:01 AM2018-06-16T06:01:32+5:302018-06-16T06:01:32+5:30
ज्येष्ठ कलावती शकुंतलाबाई नगरकर आणि त्यांच्या ‘संगीतबारी’तल्या कलावतींनी अवघा रंगमंच कवेत घेत उत्कटतेने या ‘बारी’चा उभा केलेला फड अनुभवण्याचे भाग्य नाट्यसंमेलनातील रसिकांना याचि देही याचि डोळा मिळाले.
राज चिंचणकर
मुंबई : ज्येष्ठ कलावती शकुंतलाबाई नगरकर आणि त्यांच्या ‘संगीतबारी’तल्या कलावतींनी अवघा रंगमंच कवेत घेत उत्कटतेने या ‘बारी’चा उभा केलेला फड अनुभवण्याचे भाग्य नाट्यसंमेलनातील रसिकांना याचि देही याचि डोळा मिळाले. शकुंतलाबाई नगरकर यांनी या ‘बारी’तल्या लावणीत नाट्याची जी काही बहार उडवली, त्याला सलाम करणे भाग पडले.
‘नेसली पितांबर’मध्ये त्यांनी एका ब्राह्मणाची दिनचर्या ज्या तपशिलाने सादर केली, तिला तोड नाही. यात या ज्येष्ठ कलावंतीणीचे वय कुठेही आड येत नाही, हे विशेष! ‘आम्ही काशीचे ब्राह्मण’ या ओळी घोळवून त्यांच्या पुनरावृत्तीत त्यांनी भन्नाट रंगछटा दाखवल्या आणि या ‘संगीतबारी’ने तमाम रसिकांवर गारुड केले.
बारीबारीने केले जाणारे लावण्यांचे साभिनय ‘प्रयोग’ म्हणजे ‘संगीतबारी’! मात्र, हा प्रकार शहरी रसिकांना माहीत असेलच असे नाही. नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने मात्र या मोहमयी अदाकारीचे रंगमयी प्रतिबिंब पडले. विविध रसांच्या माध्यमातून साकारणारी बैठकीची, खडी, बालेघाटी, देशभक्तीपर, स्थलकालवर्णनपर असे नानाविध प्रकार लावणीत आहेत. एवढेच नव्हे; तर ‘अंधाराची लावणी’ असा एक हटके प्रकारही यात आहे. अर्थात, हे आणि असे सारे ज्ञान मिळाले, ते या ‘संगीत बारी’च्या प्रयोगातून!
शकुंतलाबाई नगरकर, पुष्पा सातारकर व आकांक्षा कदम यांनी या ‘संगीतबारी’चे सुकाणू हाती घेतले होते. लावणीचे अभ्यासक भूषण कोरगावकर यांनी यापूर्वी लिहिलेल्या ‘संगीतबारी’ या त्यांच्याच पुस्तकावरून त्यांनी हा प्रयोग रंगभूमीवर लेखणीतून उतरवला आहे. त्यांना लावणीच्या अभ्यासक असलेल्या सावित्री मेधातुल यांची दिग्दर्शकीय साथ लाभली आहे. चंद्रकांत लाखे (पेटी), सुनील जावळे (तबला), विनायक जावळे (ढोलकी) यांच्या साथीने ‘संगीतबारी’चा हा फड रंगला. या ‘मिळून साऱ्याजणां’नी रंगभूमीवर या ‘बारी’चा जो प्रयोग सादर केला; तो नजरेत ठसत गेला.