पुण्यात अजब चोरी : चोरांची शिजली 'डाळ'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 09:38 PM2018-08-01T21:38:11+5:302018-08-01T21:41:42+5:30
शहरात सध्या पोलिस आणि नागरिकांपेक्षा बारीक सारीक गोष्टींवर चोरट्यांचेच अधिक लक्ष असल्याचे दिसत आहे.
पुणे : शहरात सध्या पोलिस आणि नागरिकांपेक्षा बारीक सारीक गोष्टींवर चोरट्यांचेच अधिक लक्ष असल्याचे दिसत आहे. तुरडाळ, कांदे महाग झाले की त्यावरचे विनोद व्हायरल होत असतात़ पण चोरट्याने प्रत्यक्षात डाळ चोरुन नेली तर ? अशी घटना सिंहगड रोडवरील सनसिटी येथे घडली आहे़ चोरट्यांनी मौल्यवान ऐवज असल्याचे समजून हरभरा डाळ असलेली पिशवी चोरुन नेली़ आहे. स्वप्नील शिवानंद कुलकर्णी (वय २५, रा. प्रयेजा सिटी, सिंहगड रोड) यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील कुलकर्णी हे विद्यार्थी असून, ते सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घरगुती किराणा घेण्यासाठी आले होते. त्यादरम्यान त्यांनी करड्या रंगाची पिशवी सोबत आणली होती. त्यांनी एका दुकानातून ५०० रुपयांची रिवाईटलची बॉटल आणि ९० रुपयांची १ किलो हरभरा डाळ घेतली. तसेच, जुना पासपोर्ट आणि त्याच्या काढलेल्या दोन झेरॉक्स प्रतही या पिशवीत ठेवल्या. त्यानंतर ते सनसिटी रोडवरील आनंदनगरमध्ये असणाºया हनुमान मंदिरात दर्शनासाठी गेले. त्यांनी रोडच्या कडेला काही क्षणांसाठी दुचाकी उभी केली व पिशवी दुचाकीला अडकविली. काही मिनिटांनी ते परत आले तर दुचाकीची पिशवी गायब. पिशवी न सापडल्याने सिंहगड रोड पोलिस ठाण्यात धाव घेतली़. पोलिसांनीही त्यांची फिर्याद दाखल करुन घेतली आहे़ पोलिस हवालदार आर. आय. शेख हे अधिक तपास करत आहेत.