‘त्यांच्या’ समझोत्याने फरक पडत नाही - प्रकाश आंबेडकर; पवार-मायावती यांच्याबाबत स्पष्टोक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2018 01:56 AM2018-08-03T01:56:33+5:302018-08-03T01:56:51+5:30
महाराष्ट्रातील दलित समाजाला बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांच्या माध्यमातून एकत्र आणण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रयत्नामुळे कोणाला काही फरक पडणार नाही.
बुलढाणा : महाराष्ट्रातील दलित समाजाला बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांच्या माध्यमातून एकत्र आणण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रयत्नामुळे कोणाला काही फरक पडणार नाही. आम्हाला तर कुठलाच फरक पडणार नाही, असे स्पष्ट करीत पवार यांनी कोणासोबत समझोता करावा, हा त्यांचा प्रश्न आहे, असे भारिप-बहुजन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी येथे स्पष्ट केले.
शरद पवार हे महाराष्ट्रात मायावतींना सक्रिय करण्याच्या दृष्टीने हालचाली करीत आहेत. त्यातून आंबेडकरांना पर्याय उभा करणारा एक नवा राजकीय अध्याय सुरू करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्या अनुषंगाने गेल्या आठवड्यात पवार व मायावती यांच्यामध्ये झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अॅड. आंबेडकर यांना विचारले असता ते म्हणाले, पवार यांच्या भूमिकेवर आम्ही प्रतिक्रिया द्यावी, अशी काही परिस्थिती नाही. प्रत्येक राजकीय पक्षाला स्वातंत्र्य आहे. त्यांनी कोणाबरोबर समझोता करायचा, कोणाबरोबर करायचा नाही, हा त्यांच्या स्वायत्ततेचा भाग आहे, तो आपण हिरावून घेऊ नये.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडी संवाद यात्रेनिमित्त बुलढाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पवारांवर टीकास्त्र सोडले. शरद पवार फुले, शाहू, आंबेडकरवादी असले, तरी त्यांचा पक्ष हा भाजपाधार्जिणा आहे. भाजपाला सरकार स्थापनेदरम्यान सहकार्याची भूमिका त्यांनी घेतली होती, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करण्यास आपण इच्छुक नाही. मात्र, धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी काँग्रेससोबत आघाडीचा पर्याय खुला आहे. काँग्रेसकडून त्यास अद्याप उत्तर मिळालेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
...श्रेय घेण्याची चढाओढ
अॅट्रॉसिटी कायदा कडक करण्याच्या दृष्टीने विधेयकास केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिल्यासंदर्भात प्रकाश आंबेडकर म्हणाले, हे असे होणे अपेक्षितच होते. त्यासाठी श्रेय घेण्याची चढाओढ सुरू आहे.
पुढील निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अॅन्टी शेड्युल कास्ट तथा ट्राइब असा समज लोकांमध्ये पसरू नये, यासाठी आता हे प्रयत्न होत आहेत. कोर्टाने या प्रश्नी रिव्हिव केला; पण निर्णय दिलेला नाही.