‘त्यांचे’ सौंदर्य पुन्हा खुलणार!

By admin | Published: June 3, 2017 03:24 AM2017-06-03T03:24:27+5:302017-06-03T03:24:27+5:30

अ‍ॅसिडहल्ल्यातील पीडित आजही समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहेत. या पीडितांची चूक नसतानाही संपूर्ण आयुष्यभर

'Their beauty' will open again! | ‘त्यांचे’ सौंदर्य पुन्हा खुलणार!

‘त्यांचे’ सौंदर्य पुन्हा खुलणार!

Next

स्नेहा मोरे/ लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अ‍ॅसिडहल्ल्यातील पीडित आजही समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहेत. या पीडितांची चूक नसतानाही संपूर्ण आयुष्यभर त्यांना शिक्षा भोगावी लागते. बऱ्याचदा या पीडितांची कुटुंबेही त्यांना स्वीकारत नाहीत. अशा वेळी स्वत:चे अस्तित्व घडविण्यासाठी समाजात धडपडत असताना शिक्षण, नोकरी या क्षेत्रांमध्येही त्यांच्या पदरी निराशा येते, परंतु हे निराशाजनक चित्र लवकरच बदलणार आहे. राज्य महिला आयोगाच्या पुढाकाराने खासगी रुग्णालयांच्या माध्यमातून या अ‍ॅसिडहल्ल्यातील पीडितांचे सौंदर्य पुन्हा खुलणार आहे.
अ‍ॅसिडहल्ल्यातील पीडितांचे पुनर्वसन करण्यासाठी काही महिन्यांपूर्वी राज्य महिला आयोगाने ‘सक्षमा’ हा उपक्रम सुरू केला. त्याअंतर्गत अ‍ॅसिडहल्ल्यातील पीडितांसाठी ‘कॉन्फिडन्स वॉक’ घेऊन त्यांना जगण्याचे बळ देण्यात आले. या उपक्रमांतर्गत पीडितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले, जनजागृती करण्यात आली. परिणामी, आता राज्यातील नामांकित खासगी रुग्णालयांनी स्वत: पुढाकार घेऊन, राज्य महिला आयोगाकडे याविषयी विचारणा केली आहे. त्यामुळे आता लवकरच या पीडितांना शस्त्रक्रियेनंतर सुंदर आयुष्य मिळणार आहे.
बॉम्बे रुग्णालय, सैफी रुग्णालय, डी. वाय. पाटील रुग्णालय, सिग्मा रुग्णालय, दहीफळे रुग्णालय, बेंबडे रुग्णालय अशा विविध रुग्णालयांनी अ‍ॅसिडहल्ल्यातील पीडितांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी सकारात्मकता दर्शविली आहे. याची पुढील प्रक्रिया सुरू झाली असून, वेगवेगळ्या केसचा अभ्यास करून व पीडितांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येईल, परंतु अ‍ॅसिडहल्ल्यातील पीडितांच्या पुनर्वसनाला या माध्यमातून नवी दिशा मिळाल्याचे अत्यंत समाधान आहे, अशी भावना याविषयी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

लहानग्यांच्या शिक्षणाचीही जबाबदारी

अ‍ॅसिडहल्ल्यातील पीडितांच्या उपचारांप्रमाणेच त्यांच्या लहानग्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्यासाठी रायन इंटरनॅशनल शाळेने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे आता लवकरच त्यांच्या प्रवेशाची प्रक्रियाही सुरू होईल, अशी माहिती राज्य महिला आयोगाने दिली.

पैशाअभावी बऱ्याचदा अ‍ॅसिडहल्ल्यातील पीडितांना शस्त्रक्रियांपासून वंचित राहावे लागते, काही वेळा या शस्त्रक्रिया करण्यास नकारही मिळाला आहे. मात्र आता राज्य महिला आयोगाच्या सहकार्याने ही प्रक्रिया सोपी झाली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या पुढाकारामुळे मागील काही दिवसांत माझ्यासह बहीण रेश्मावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे आयोगाने घेतलेल्या या जबाबदारीमुळे भविष्यातील या पीडितांचे आयुष्य सुकर होऊन त्यांना नव्याने जगण्याचे बळ, आत्मविश्वास मिळेल.
- दौलतबी खान, अ‍ॅसिड सरव्हायव्हर्स साहस फाउंडेशन, संस्थापक

निधी खात्यात जमा
अ‍ॅसिडहल्ल्यातील पीडितांच्या पुनर्वसनाकरिता त्यांच्या बँक खात्यात ५० हजार व पोस्टाच्या खात्यात ५० हजार रुपयांचा निधी जमा करण्यात आला आहे. या माध्यमातून आता तरी समाजाच्या मुख्य प्रवाहात खंबीरपणे उभे राहण्यासाठी पीडितांना मदत होईल, अशी आशा असल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सांगितले. अ‍ॅसिडहल्ल्यातील १४ पीडितांना नोकरीला लावण्यात आले असून, त्यातील पहिल्या टप्प्यातील चौघींचे वेतनही झाले आहे, अशी माहिती रहाटकर यांनी दिली.


रुग्णालय व्यवस्थापनाशी चर्चा सुरू
अ‍ॅसिडहल्ल्यातील पीडितांवर होणाऱ्या शस्त्रक्रियांचा आर्थिक भार स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने उचलण्यात येणार आहे. या आर्थिक तरतुदींविषयी सध्या रुग्णालयाच्या व्यवस्थापनाशी चर्चा सुरू आहे. प्लास्टीक सर्जरीबद्दल अनेक गैरसमज आहेत. प्लास्टीक सर्जरीला फक्त कॉस्मेटिक सर्जरीशी निगडित ठेवले जाते, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, कॉस्मेटिक सर्जरी ही प्लास्टीक सर्जरीची उपशाखा आहे. या पीडितांवर साधारणत:
४०- ६० शस्त्रक्रिया करण्यात येतात, त्यानंतर रिकव्हरीसाठी किमान
२-३ महिने द्यावे लागतात. नुकतेच विवाहबद्ध झालेल्या ललिता या अ‍ॅसिडहल्ल्यातील पीडितेच्या १७ शस्त्रक्रिया झाल्या आहेत, त्यामुळे ही प्रक्रिया काहीशी मोठी असते, परंतु यामुळे अ‍ॅसिडहल्ल्यातील पीडितांना नवे रूप व त्यामुळेच जगण्यासाठी आवश्यक आत्मविश्वास मिळेल याची खात्री आहे. - डॉ. अशोक गुप्ता, प्लास्टीक सर्जरी विभाग प्रमुख (बॉम्बे रुग्णालय)

Web Title: 'Their beauty' will open again!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.