...तर १०० टक्के उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री केले असते; संजय राऊतांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 07:21 PM2023-08-12T19:21:29+5:302023-08-12T19:21:43+5:30
२०१४ मध्ये आम्ही भाजपाविरोधात लढलो, लोकांनी आम्हाला बहुमत दिले होते ते भाजपाविरोधात होतं असं राऊतांनी म्हटलं.
मुंबई – महाविकास आघाडी स्थापन करताना प्रत्येक प्रक्रियेत एकनाथ शिंदे सामील होते. त्यांना सगळं मान्य होते. उद्धव ठाकरेंनी त्यांना सोबत घेऊनच निर्णय घेतलेत. जर भाजपाने दिलेला शब्द पाळला असता तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत म्हणाले की, भाजपा-शिवसेनेत अडीच अडीच वर्षाचं मुख्यमंत्रिपद देण्याचे ठरले होते. जर भाजपाने मुख्यमंत्रिपदाचा शब्द पाळला असता तर उद्धव ठाकरेंनी १०० टक्के मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांचे नाव पुढे केले असते. पण भाजपाने मुख्यमंत्रिपद नाकारले. भाजपाने ही गोष्ट मान्य केली असती तर पक्ष फुटला नसता. तुम्ही आता त्यांना मुख्यमंत्रिपद दिले. पण तेव्हाही आम्ही एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री करणार होतो. तेव्हा भाजपाने नाकारले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. या सरकारमध्ये महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी शिंदेंकडेच होती असं त्यांनी सांगितले.
२०१४ मध्ये आम्हाला भाजपाविरोधात जनमत होतं...
२०१४ मध्ये आम्ही भाजपाविरोधात लढलो, लोकांनी आम्हाला बहुमत दिले होते ते भाजपाविरोधात होतं. भाजपाला तेव्हा बहुमत नव्हते. मोदींच्या लाटेतही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेला ६४ जागा जिंकल्या. आमचा दारूण पराभव करण्यासाठी प्रयत्न झाले. पण ६४ जागांवर विजय मिळाला हे भाजपाविरोधातील जनमत होते पण तरीही आम्ही एकत्रित आलो होतो असा टोला खासदार संजय राऊतांनी भाजपाला लगावला. शिवसेना पॉडकास्टमध्ये आदेश बांदेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
जिथे कसाब तिथेच मी होतो...
जेलमध्ये बंधने खूप असतात. जिथे कसाब होता तिथेच मी होतो. पण मी राहिलो, तक्रार केली नाही. कुठलीही सुविधा घेतली नाही. मी कधीही काही मागितले नाही. जितक्या दिवस छळायचे ते छळा. पुस्तके वाचणे आणि लोकांना भेटण्याची परवानगी कोर्टाने दिली होती. तुरुंगातील १ दिवस म्हणजे १०० दिवस. १ ताससुद्धा जात नाही. भिंतीपलीकडे जग नाही. शिवसेनेचं कुटुंब मोठं होतं. जेव्हा मला कोर्टात आणले जायचे तेव्हा हजारो शिवसैनिक कोर्टात जमायचे. शिवसैनिक नेते कुटुंबाच्या संपर्कात होते. माझ्या कुटुंबाशी सर्व नेते संपर्कात होते. हा कितीमोठा अन्याय आहे हे सगळ्यांना माहिती होते असा अनुभवही संजय राऊतांनी सांगितला आहे.