"...तर राज्यात तिसरी आघाडी उघडावी लागेल", बच्चू कडू यांचा महायुतीच्या नेत्यांना सूचक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2024 02:37 PM2024-07-09T14:37:01+5:302024-07-09T14:59:16+5:30

Bachchu Kadu : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. अशात राज्यात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. 

"...then a third alliance will have to be opened in the state", Bachchu Kadu signal to exit the grand coalition | "...तर राज्यात तिसरी आघाडी उघडावी लागेल", बच्चू कडू यांचा महायुतीच्या नेत्यांना सूचक इशारा

"...तर राज्यात तिसरी आघाडी उघडावी लागेल", बच्चू कडू यांचा महायुतीच्या नेत्यांना सूचक इशारा

मुंबई : नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर, भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी राज्यामधील मतदार याद्या अद्ययावत करण्याचा कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे. तसेच, या पार्श्वभुमीवर राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोगाकडून बैठक घेण्यात आली आहे. दुसरीकडे, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. अशात राज्यात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. 

प्रहारचे अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांनी महायुतीच्या नेत्यांना सूचक इशारा दिला आहे. मी शिंदे सरकारवर नाराज नाही. पण जर या सरकारने शेतकऱ्यांबाबत कुठलाही ठोस निर्णय घेतला नाही. तर आम्हाला राज्यामध्ये तिसरी आघाडी उघडावी लागेल, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. बच्चू कडू हे सध्या राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या सरकारमध्ये आहेत. बच्चू कडू यांनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

"मी सरकारवर नाराज नाही. पण जर सरकारने शेतकऱ्यांबाबत कुठलाही ठोस निर्णय घेतला नाही. तर आम्हाला राज्यामध्ये तिसरी आघाडी उघडावी लागेल. तिसऱ्या आघाडीद्वारे आम्ही १५ ते १७ जागा या विधानसभेला लढवू आणि त्या जिंकू देखील, असा आम्हाला विश्वास आहे. शेतकऱ्यांचे बरेच प्रश्न आहेत, जे मार्गी अद्यापही लागलेले नाहीत. त्यामुळे वेळ पडली तर शेतकऱ्यांसाठी तसा निर्णय घ्यावा लागेल", असे बच्चू कडू यांनी सांगितले.

राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागावेत, यासाठी आम्ही रविकांत तुपकर यांची भेट घेतली आहे. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांच्यासोबतही आमची बैठक होणार आहे. येत्या निवडणुकीआधी तिसऱ्या आघाडीचा आम्ही विचार करत आहोत, असे विधान बच्चू कडू यांनी केले आहे. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चांगले काम करत आहेत. त्यांच्या ज्या योजना आहेत. त्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्याच पाहिजेत. पण त्यासोबतच त्याची जाहिरात त्यांच्या पक्षासाठी होऊ नये ही आमची भूमिका आहे, असे बच्चू कडू म्हणाले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात तिसरी आघाडी तयार होते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Web Title: "...then a third alliance will have to be opened in the state", Bachchu Kadu signal to exit the grand coalition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.