'तर राज्यात भाजपा-राष्ट्रवादी आघाडीचं सरकार आलं असतं, परंतु...' शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 08:37 AM2021-12-30T08:37:10+5:302021-12-30T09:42:20+5:30
Sharad Pawar News: Shiv Sena मुख्यमंत्रिपदासाठी अडून बसल्याने राजकीय पेच निर्माण झाल्यावर पंतप्रधान Narendra Modi यांनी BJP आणि NCPने आघाडी करून सरकार स्थापन करावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्याविषयी माझ्यासोबत चर्चाही झाली होती. मात्र मी त्याला नकार दिला, असे शरद पवार यांनी सांगितले.
मुंबई - २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात झालेल्या मोठ्या राजकीय उलथापालथीबाबत नवनवे गौप्यस्फोट अजूनही होत असतात. दरम्यान, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर महायुतीतून शिवसेनेला आघाडीत आणून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकासआघाडीचे सरकार स्थापन करण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या शरद पवार यांनी तेव्हाच्या घडामोडींबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेना मुख्यमंत्रिपदासाठी अडून बसल्याने राजकीय पेच निर्माण झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीभाजपा आणि राष्ट्रवादीने आघाडी करून सरकार स्थापन करावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्याविषयी माझ्यासोबत चर्चाही झाली होती. मात्र मी त्याला नकार दिला, असे शरद पवार यांनी सांगितले.
शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून एका वृत्तपत्राने आयोजित केलेल्या एका पुस्तक प्रशाशनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी हा गौप्यस्फोट केला. ते म्हणाले की, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर शिवसेना आणि भाजपामधील मतभेद वाढू लागले होते.शिवसेना मुख्यमंत्रिपदासाठी अडून बसली होती. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन राज्यात सरकार स्थापन करण्याचा विचार मोदींच्या मनात आला असावा. त्या पार्श्वभूमीवर माझी आणि मोदींची दिल्लीमध्ये भेट झाली तेव्हा महाराष्ट्रात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करण्याबाबत चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींची तशीच इच्छा होती. मात्र मी पंतप्रधानांच्या कार्यालयात जाऊन हे शक्य नाही, याची कल्पना मोदींना दिली. तेव्हा अजूनही विचार करा, असा सल्ला मोदींनी दिला. मात्र मी ठामपणे नकार दिला.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने मुख्यमंत्रिपदासाठी ठाम भूमिका घेतल्याने राजकीय पेच निर्माण झाला होता. भाजपा शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्यास तयार नव्हता. त्यावेळी राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे तीन पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करतील, अशी चर्चा सुरू झाली होती. दरम्यान, अचानक शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट झाली होती. त्यानंतर काही दिवस राज्यात राष्ट्रपती राजवट लागली होती. तेव्हा अचानक देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राजभवनात जाऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता.
या शपथविधीला शरद पवार यांचा पाठिंबा होता, अशीची चर्चा सुरू होती. त्यावरही शरद पवार यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, त्या शपथविधीसाठी मी अजित पवारांना भाजपासोबत पाठवल्याची चर्चा नेहमीच होत अशते. मात्र मी त्यांना पाठवलं असतं तर त्यांनी सरकारच स्थापन केलं असतं. त्यांनी अर्धवट काम केलं नसतं, मी अजित पवार यांना फडवणीस यांच्यासोबत सरकार स्थापन करण्यासाठी पाठवलं होतं या चर्चेला काहीच अर्थ नाही, असंही शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगतलं.