... तर भाजपने बक्कळ पैसा कमावला असता, एलॉन मस्कचं ट्विट अन् फडणवीसांचं रिट्विट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 04:49 PM2022-11-01T16:49:18+5:302022-11-01T16:51:58+5:30
राज्यातील सत्तासंघर्षात शिंदे-फडणवीस सरकारविरुद्ध महाविकास आघाडीचे नेते आक्रमक होताना दिसत आहेत
मुंबई - वेदांतानंतर नागपूरच्या मिहानमध्ये होणारा टाटा एअरबसचा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने सरकाविरोधात जनमत तयार झालं आहे, त्यावरुन, फडणवीसांनी भूमिका स्पष्ट केली. यावेळी, काही पत्रकारांबद्दल त्यांनी HMV असा शब्दप्रयोग केला. महाराष्ट्रात आमच्याविरुद्ध फेक नरेटीव्ह तयार करण्याचा प्रयत्न होत आहे, असे फडणवीस म्हणाले होते. त्यानंतर, पुन्हा एकदा ट्विटच्या माध्यमातून त्यांनी HMV पत्रकार आणि विरोधकांवर टीका केली आहे. यावेळी, ट्विटरचा मालक एलॉन मस्कचं ट्विट रिट्विट करत त्यांनी, भाजपने बक्कळ पैसा कमावला असता, असे म्हटले.
राज्यातील सत्तासंघर्षात शिंदे-फडणवीस सरकारविरुद्ध महाविकास आघाडीचे नेते आक्रमक होताना दिसत आहेत. त्यामध्ये, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेते पुढे असून भास्कर जाधव, सुषमा अंधारे, आदित्य ठाकरे हे सरकारवर तोफ डागत आहेत. त्यातच, काही पत्रकार आणि लेखकही सोशल मीडियातून आपल्या भावना व्यक्त करताना सरकारवरील रोष व्यक्त करत आहेत. त्यासंदर्भात बोलताना फडणवीसांनी HMV हा शब्दप्रयोग केला होता. आता, पुन्हा एकदा एलॉन मस्कच्या ट्विटला रिट्विट करत मिश्कीलपणे तीच भूमिका मांडली.
And if I had a rupee for every #FakeNarrative attempted against me and our party by the opposition + #HMV s , BJP would be minting money! 🙋🏻♂️ https://t.co/yuXfnIkrPR
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 31, 2022
ट्रम्प ट्विटरवर परत येणार का असा मला ज्या-ज्या वेळी कोणी प्रश्न विचारला आहे त्या प्रत्येकाच्या प्रश्नामागे मला डॉलर मिळाला असता तर आज ट्विटरकडे बक्कळ पैसा असता असं ट्विट एलॉन मस्क यांनी केलं होतं. त्यांचं हेच ट्विट रिट्विट करून देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधला. तसेच, याच वाक्याला धरुन भाजपची भूमिका मांडली. ‘माझ्या आणि पक्षावरील प्रत्येक फेक नरेटिव्हसाठी जर मला एक रुपया मिळाला असात तर आज भाजपाने बक्कळ पैसा कमावला असता’ असं देवेंद्र फडणवीस यांनी रिट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे, फडणवीसांचं हे ट्विट सध्या चांगलंच चर्चेत आहे.
काय म्हणाले होते फडणवीस
महाराष्ट्रात आमचं सरकार येऊन तीनच महिने झाले आहेत, तरीही महाराष्ट्रात आमच्याविरुद्ध फेक नरेटीव्ह तयार करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामध्ये, काही राजकीय पक्ष, त्यांची इको सिस्टीम आणि दुर्दैवाने एचएमव्ही पत्रकार, जे बोटावर मोजण्याइतके केवळ ४-५ आहेत. ह्यांनी एकत्रितपणे महाराष्ट्राच्या बदनामीचा घाट घातला आहे, असे फडणवीसांनी म्हटले. यावेळी, एक पत्रकाराने HMV चा अर्थ विचारला असता, His Masters Voice म्हणजे त्यांचा बुलंद आवाज असा अर्थ फडणवीसांनी सांगितला.
आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर
देवेंद्र फडणवीसांनी काही पत्रकारांना एचएमव्ही म्हटल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच, हा पत्रकारांचा आणि पत्रकारितेचा अपमान आहे. जे पत्रकार आमच्याविरोधातही लिहितात, बोलतात, त्यांनी यांच्याविरोधात लिहिलं तर त्यांना His Master Voice म्हणणं हे अपमाजनक असल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच, नोकऱ्यांसाठी, विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या युवकांना शेंबडी पोरं म्हणणं बरोबर नाही. देवेंद्र फडणवीसांनी यापूर्वी शब्द मागे घेतले होते, आताही त्यांनी हे शब्द मागे घ्यावेत, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.