CoronaVirus: ... तर कोरोना महामारी नाही, ठरणार साथीचा आजार; महाराष्ट्राच्या टास्क फोर्समधील तज्ज्ञांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 06:53 AM2021-11-04T06:53:33+5:302021-11-04T06:53:55+5:30
Corona Virus in Maharashtra: राज्यात अधिक तीव्रतेने आलेल्या दुसऱ्या लाटेचे प्रमुख कारण ‘डेल्टा’ हेच होते. सध्या राज्यात ‘डेल्टा’ने बाधित झालेल्यांचे प्रमाणही जास्त आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यासह मुंबईत कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आहे. गेल्या काही महिन्यांत निर्बंध शिथिलतेनंतरही दैनंदिन रुग्णांसह मृत्यूचे प्रमाण आटोक्यात राहिले आहे. या पार्श्वभूमीवर डिसेंबरपर्यंत सर्व पातळ्यांवरील कोरोना संसर्गाची स्थिती नियंत्रणात राहिल्यास महामारीऐवजी (पॅन्डेमिक) केवळ एक साथीचा आजार (एन्डेमिक) म्हणून कोरोनाची वाटचाल सुरू होईल, असे निरीक्षण राज्याच्या कोरोना टास्क फोर्समधील तज्ज्ञांनी मांडले आहे.
राज्यात अधिक तीव्रतेने आलेल्या दुसऱ्या लाटेचे प्रमुख कारण ‘डेल्टा’ हेच होते. सध्या राज्यात ‘डेल्टा’ने बाधित झालेल्यांचे प्रमाणही जास्त आहे. आपण सातत्याने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी नमुने पाठवून लक्ष ठेवून आहोत. परंतु गेल्या चार महिन्यांत कोरोना विषाणूच्या रूपात फारसा बदल झालेला आढळलेला नाही. हीच स्थिती कायम राहिल्यास डेल्टाविरोधात प्रतिकारशक्ती तयार झालेल्या समाजात पुन्हा ‘डेल्टा’मुळेच लाट येण्याची शक्यता नाही. त्यामुळे तिसरी लाट येण्याची शक्यता फार कमी आहे, असे निरीक्षण कोरोना टास्क फोर्सच्या डॉ. शशांक जोशी यांनी मांडले आहे.
एन्डेमिक म्हणजे नेमके काय?
स्वाइन फ्लूचा आता मोठा उद्रेक होताना दिसत नाही. परंतु दर महिन्याला काही रुग्ण आढळतात. त्याप्रमाणेच पुढील काळात कोरोनाही ‘ॲन्डेमिक’ स्थितीमध्ये आपल्या सोबत असणार आहे.
कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यकच
गेल्या दोन, तीन महिन्यांत वातावरणीय बदलांच्या आजारांचे प्रमाण वाढत आहे, याचाच अर्थ कोरोना विषाणू काही प्रमाणात कमकुवत झालेला आहे, असा निष्कर्ष काढता येईल.
दुसरे म्हणजे, विषाणूचा प्रसार आटोक्यात आला असला तरी एखाद्या विभागात, प्रदेशात छोट्या प्रमाणात उद्रेक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला तरी मास्कचा वापर, सुरक्षित सामाजिक अंतर आणि हातांची स्वच्छता या बाबींचे पालन करणे आवश्यकच असल्याचे डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले.
कोव्हॅक्सिनला डब्ल्यूएचओची मान्यता
जागतिक आरोग्य संघटनेने भारतीय बनावटीच्या कोरोना प्रतिबंधक कोव्हॅक्सिन या लसीला अखेर आपत्कालीन वापरासाठी बुधवारी मंजुरी दिली. लसीची परिणामकारकता आणि सुरक्षितता यावर आरोग्य संघटनेने शिक्कामोर्तब केल्याने आता जगभरातील देशांनाही ही लस घेता येईल.